Maval : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे धाबे दणाणले!

पाच विधानसभा मतदारसंघात बारणे यांना मताधिक्य

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघातील पाच विधानसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप आमदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. तर, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे धाबे दणाणले आहेत. मोदी लाट अशीच राहिली तर आपलीही अवस्था अशीच होईल याची धास्ती विधानसभा महाआघाडीच्या इच्छूकांनी घेतली आहे.

शिवसेना-भाजपचे श्रीरंग बारणे यांना 7 लाख 20 हजार 663 मते मिळाले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांना 5 लाख 4 हजार 750 मते पडली. बारणे यांनी 2 लाख 17 हजार 763 मताधिक्य घेत विजय मिळवला. मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पाच विधानसभा मतदारसंघातून बारणे यांना मताधिक्य मिळाले आहे.

  • घाटावरील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तर घाटाखालील पनवेल, उरणमधून बारणे यांना मताधिक्य आहे. या पाचही विधानसभा मतदारसंघात शिवसेना-भाजपचे आमदार आहेत. तर, पार्थ यांना केवळ कर्जत मतदारसंघातून 1850 मताधिक्य मिळाले. शिवसेनेचे श्रीरंग बारणे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक म्हणजेच 96 हजार 758 मताधिक्य मिळाले आहे. पिंपरीतून 41 हजार 294, मावळमधून 21 हजार 827, पनवेलमधून 54 हजार 658 आणि उरणमधून 2888 चे मताधिक्य मिळाले. तर, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 75725 मते मिळाली.

विधानसभा इच्छुकांसाठी लोकसभेची निवडणूक ‘सेमी फायनल’ समजली जाते. सेमी फायनलमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फेल ठरली आहे. त्यामुळे चार महिन्यावर आलेली विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी याची धास्ती घेतली आहे. त्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. विधानसभा निवडणुकीत देखील मोदी लाट राहू शकते. त्यामुळे निवडणूक लढवावी की नाही या विंवचनेत काँग्रेस-राष्ट्रवादीचे इच्छूक आहेत. लोकसभेच्या मताधिक्याने आपसूकच आघाडीचे इच्छूक देखील कमी झाले आहेत. मावळातील चित्र पाहत शिवसेना-भाजप महायुती मावळमधील सहा पैंकी पाच विधानसभा मतदारसंघ सहज ताब्यात ठेऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जतमधील एकमेव जागा देखील धोक्यात आली आहे.

  • शेकापच्या वर्चस्वाला हादरा!
    मावळ मतदारसंघ पुणे आणि रायगड या दोन जिल्ह्यात येतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत, उरण, पनवेल या तीन विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व होतो. शेकापने राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांना पाठिंबा दिला. परंतु, शेकाप एकाही मतदारसंघातून पार्थ यांना मताधिक्य देऊ शकले नाही. त्यामुळे शेकापच्या वर्चस्वाला देखाली हादरा बसल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.