Maval : काँग्रेसकडून अॅड. खंडुजी तिकोणे यांच्यावरील निलंबन कारवाई मागे

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून निवडणूक लढविलेल्या अॅड. खंडुजी तिकोणे यांच्यावरील निलंबनाची कारवाई काँग्रेस पक्षाने मागे घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ‘आयात’ उमेदवार दिल्याच्या निषेधार्थ अॅड. तिकोणे यांनी विधानसभा निवडणुकीत बंडाचे निशाण फडकवले होते. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पक्षाच्या तालुकास्तरीय बैठकीत चर्चा होऊन अॅड. तिकोणे यांच्यावरील कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांनी अॅड. तिकोणे यांना निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आल्याबाबत लेखी पत्र दिले. अॅड. तिकोणे यांचे काँग्रेस पक्षासाठी आतापर्यंत केलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात येत आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पैलवान चंद्रकांत सातकर यांच्या मान्यतेने तालुका काँग्रेस समितीने हा निर्णय घेतला आहे, असे ढोरे यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.