Maval Corona News : सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे ; कोरोना आढावा बैठकीत आमदार शेळके यांचा डॉक्टरांशी संवाद

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात कोरोनाचा फैलाव होत असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी डॉक्टरांना केली.

वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृह येथे शुक्रवारी (दि.23) कोरोना आढावा बैठकीच्या निमित्ताने उपस्थित खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स, तालुका आरोग्य विभागातील डॉक्टर्स, कर्मचारी यांच्यासोबत आमदार शेळके यांनी संवाद साधला.

यावेळी प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, वडगाव नगरपंचायत मुख्याधिकारी सुवर्णा ओगले, तालुका समन्वयक गुणेश बागडे उपस्थित होते.

आमदार शेळके यांनी खाजगी रुग्णालयांच्या समस्या जाणून घेतल्या. कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत असतानाच आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण होत आहे. ही बाब गांभीर्याने घेत मावळ तालुक्यातील प्रत्येक रुग्णाला वेळेत उपचार देण्यासाठी खाजगी डॉक्टरांनीही कोविड केअर सेंटर सुरू करून सहकार्य केले आहे, असे शेळके म्हणाले.

नाशिकमधील प्राणवायू दुर्घटना लक्षात घेत प्राणवायूचा साठा, ऑक्सिजन यंत्रणा ऑडीट करून घेणे गरजेचे आहे. राज्यातील प्राणवायूची कमतरता लक्षात घेता त्याचा सुयोग्य व काटकसरीने वापर करण्याची सूचना आमदार शेळके यांनी केली.

* बैठकीत डॉक्टरांना  दिल्या ‘या’ सूचना

– कोविडच्या रुग्णांचे बिल हे शासनाने निर्देशित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून ठरवून दिलेल्या दराप्रमाणेच आकारावे.

– रेमडेसिवीर देण्याचे धोरण ठरविण्यात यावे.
इंजेक्शनचा तुटवडा असल्यामुळे नातेवाईक व रुग्णांमध्ये निर्माण झालेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यामुळे कोविडच्या प्रोटोकॉलनुसार औषधोपचाराला प्राधान्य द्यावे.

_MPC_DIR_MPU_II

– कोविड समर्पित रुग्णालयांनी नियमांचे पालन करीत रुग्णांना चांगल्या दर्जाच्या सुविधा, जेवण व औषधोपचार द्यावेत.

– बिले, सेवा, सुविधा तसेच शासकीय नियमांचे उल्लंघन आदींबाबत तक्रारी येऊ नयेत.

– शासनाने ठरवून दिलेल्या वैद्यकीय सेवांचे दरपत्रक हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावावे.

– कोविडच्या रुग्णांच्या बिलाबद्दल काही तक्रार असल्यास प्रशासन, ऑडिटर यांची मदत घेऊन सामंजस्याने निरसन करावे. यासाठी रुग्णालयाने एक व्यक्ती समन्वयक म्हणून नेमावा.

– रुग्णांच्या तब्येतीविषयी सुधारणा याबद्दल नातेवाइकांशी नियमित सुसंवादाने समुपदेशन करावे. त्यामुळे नातेवाईकांनाही दिलासा मिळेल.

– आग आणि नैसर्गिक आपत्तीपासून सुरक्षेसाठी संबंधित यंत्रणा यांची पूर्तता केली आहे का, याबद्दल खात्री करून घ्यावी.

– कोविड रुग्णालयात पुरेसे, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, वॉर्ड बॉईज, असिस्टंट डॉक्टर्स व तज्ज्ञ डॉक्टर्स सेवेवर असतील याची पुरेपूर खबरदारी घ्यावी.

– उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती खाजगी डॉक्टरांनी तालुक्‍यातील आरोग्य यंत्रणेला द्यावी. त्यामुळे अशा रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणे व त्यांच्या चाचण्या करून घेण्यास मदत होईल.

– बऱ्याच वेळा पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशन गांभीर्याने पाळत नाही त्यामुळे
पॉझिटिव्ह रुग्णांच्या गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरणावर भर द्यावा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.