Maval Corona News : मावळ तालुका कोविड-19 बहुउद्देशीय सुविधा केंद्र सुरु

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आमदार सुनील  शेळके यांच्या संकल्पनेतून मावळ तालुका कोविड19 बहुउद्देशीय सुविधा केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. मागील वर्षी देखील अशा पद्धतीचे सुविधा केंद्र सुरु केल्यामुळे नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा झाला होता.

सुविधा केंद्रामध्ये रुग्णवाहिका सुविधा, बेड उपलब्धता, शासकीय योजना माहिती, बिल तपासणी व तक्रार निवारण, क्षेत्र सर्वे नियंत्रण आदी कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये दररोज तीन शिफ्टमध्ये कर्मचारी काम करणार असून 24 x 7 अहोरात्र काम सुरू राहणार आहे.

‘कोरोनाचे संकट रोखण्यासाठी सरकार, प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र त्याला नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे महत्त्वाचे आहे. मावळच्या जनतेने घाबरून जाऊ नये. प्रशासनासह सतर्क राहून कोरोना प्रतिबंधासाठी योग्य नियोजन करण्याचा प्रयत्न असून नागरिकांनी गरज भासेल तेव्हा बहुउद्देशीय सुविधा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले आहे.

रुग्णवाहिका कक्षामध्ये तालुक्यातील सर्व खाजगी, शासकीय व अधिग्रहित केलेल्या रुग्णवाहिका यांची अद्यावत माहिती संकलित असून रुग्णांच्या आवश्यकतेनुसार रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच रुग्णवाहिका सेवेबद्दल काही अडचण निर्माण झाल्यास येथील अधिकारी त्या सोडविणार आहेत.

बेड उपलब्धता कक्षामध्ये संपूर्ण तालुक्यातील व जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती अद्यावत करण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालयाचे नाव,संपर्क क्रमांक, रुग्णालयातील बेडची क्षमता, सध्याची बेडची उपलब्धता, व्हेंटिलेटर, ऑक्‍सिजन बेडची उपलब्धता आदी माहिती अद्यावत केलेली असून गरजेनुसार बेड उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे.

विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना शासकीय योजनेसंदर्भात माहिती देणे, त्यात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्या सोडवणे आदी गोष्टी शासकीय योजना कक्षात करण्यात येणार आहे. बील तपासणी व तक्रार निवारण कक्षामध्ये नियमबाह्य पद्धतीने बिल घेणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यात येणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने प्रयोगशाळा तपासणी, औषध खर्च, रुग्ण बेड सुविधा, व्हेंटिलेटर यांचे बिल शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार बिलाची आकारणी केली आहे का हे तपासले जाणार आहे. तालुक्यातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स यांच्या मार्फत कुटुंबनिहाय सर्वेक्षण करण्यात येते.

याबाबतची सर्व माहिती अद्यावत करत त्याचे संकलन करण्याचे काम क्षेत्र सर्वे निरीक्षण कक्षात सुरु आहे. नव्याने लसीकरणाची माहिती देण्यासाठी कक्ष सुरू करण्यात येणार आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये सुविधा केंद्राचा अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर उपयोग झाला होता. हे सुविधा केंद्र सुरु करण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी पुढाकार घेतला होता. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, तत्कालिन जिल्हाधिकारी यांनी या केंद्राच्या कामकाजाचे कौतुक केले होते.

याचबरोबर मागील काही दिवसांमध्ये लसीकरण मदत कक्ष, ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता, तालुक्यातील रुग्णांना मोफत ॲम्बुलन्स सुविधा, कोरोना महामारी नियंत्रणात आणण्यासाठी खाजगी, सरकारी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांची आढावा बैठक घेत आमदार शेळके मावळातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना विरुद्धच्या लढाईत नियोजनबद्ध काम करताना दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.