Maval Corona News: नव्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला मावळातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा

एमपीसी न्यूज – पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काल (शनिवारी) लोणावळा, तळेगाव दाभाडे व देहूरोड येथे समक्ष भेट देऊन मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची तसेच कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

मावळचे आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, जिल्हा शल्यचिकित्सक नंदापूरकर, प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे, लोणावळा नगर परिषद मुख्याधिकारी रवी पवार, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरुप हरितवाल तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी, डॉक्टर सहभागी झाले होेते.

जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी सकाळी लोणावळ्यापासून हे देहूरोडपर्यंत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधा व इतर बाबींची जातीने चौकशी केली. देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड क्षेत्रातील परिस्थितीचा आढावा घेतला.कोव्हीड सेंटरना प्रत्यक्ष भेट दिली तसेच कोरोना रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची देखील चौकशी केली.

लोणावळा येथील कोविड केअर सेंटरला भेट देऊन डॉ. देशमुख यांनी त्या ठिकाणच्या सोयी सुविधांची पाहणी केली. तेथील रुग्णांशी, डॉक्टर्स, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे कौतुक करत मनोबल वाढविले. तसेच लोणावळ्यातील प्रतिबंधित क्षेत्र गवळीवाडा येथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

 

कान्हे ग्रामीण रुग्णालयात कोविड समर्पित आरोग्य केंद्र आवश्यक सुविधा आणि वैद्यकीय सामग्रीसह चालू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत आणि सन्मान करण्यात आला. तळेगाव दाभाडे नगर परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, मावळ -मुळशीचे प्रांत संदेश शिर्के, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहरे, प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, नगरसेवक गणेश खांडगे आधी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र देशमुख यांची नुकतीच जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झाली असल्याने व ते तळेगाव दाभाडे नगरीमध्ये प्रथमच आल्याने त्यांचा नगरपरिषदेच्या वतीने आमदार सुनील शेळके, नगराध्यक्ष चित्रा जगनाडे यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.

दिवसभर जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी तालुक्यात सर्व स्तरांवर अत्यंत चांगल्या प्रकारे चौकशी करून  प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत सूचना केल्याबद्दल आमदार शेळके यांनी त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभारी मुख्याधिकारी रवी पवार यांनी केले

कोरोना संसर्ग रोखण्यासोबतच कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक सोयी-सुविधांमध्ये वाढ करावी. बेडची संख्या वाढवून रुग्णांना वेळेत योग्य ते वैद्यकीय उपचार मिळवून देण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. सर्वसामान्य नागरिकांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा अधिक लाभ मिळावा. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचे अंत्यसंस्कार करताना रुग्णवाहिका, पीपीई किट, सुरक्षा साधने आदी खर्च न घेता अंत्यसंस्कार मोफत करावे, अशा प्रमुख सूचना आमदार शेळके यांनी मायमर हॉस्पिटलमध्ये झालेल्या बैठकीत बोलताना केल्या.

 जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, मावळ तालुक्यात रुग्णांच्या तपासणीचे काम वाढविण्यात येईल. तसेच ऑक्‍सिजन बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. कंटेनमेंट झोनची अंमलबजावणी प्रभावीपणे झाली पाहिजे. नियमांची अंमलबजावणी न करणार्‍यांच्या विरोधात  भरारी पथकामार्फत कारवाई करावी. ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे.

जिल्हाधिकाऱ्यांनी महत्त्वाचे निर्देश देत सद्यस्थितीत सर्व यंत्रणा उत्तमरीत्या काम करत असून येथील व्यवस्था आणि पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांविषयी समाधान व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.