Maval Corona News: बाळा भेगडे यांनी पंचायत समितीत घेतली कोरोना आढावा बैठक

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील वाढत्या कोरोनाचा संसर्ग टाळण्याच्या उपाययोजना संदर्भात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी तालुका आरोग्याधिकारी व गटविकास अधिकारी यांच्या समवेत पंचायत समिती मावळ येथे आढावा बैठक घेतली.

मावळ तालुक्याला प्राप्त होणार लसीकरणाचा साठा स्थानिक नागरिकांना उपलब्ध होत नसून 30% स्थानिक, तर 70% नागरिक बाहेरील असून यावर प्रशासनाने योग्य असे नियोजन करण्याची गरज आहे. लसीकरण रजिस्ट्रेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या कोवीन वेबसाइटमध्ये बदल करण्याची गरज असून अभियांत्रिकी क्षेत्रातील नागरिक चुकीच्या पद्धतीने लस बुक करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त होणारे रेमडीसीव्हर इंजेक्शन अजूनही सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होत नसून रुग्णालयाच्या गलथान कारभारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनसाठी मोठी आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे निदर्शनास येत असल्याकडे बैठकीत लक्ष वेधण्यात आले.

कोरोना रुग्णांना संजीवनी ठरत असलेल्या प्लाज्मासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मावळ तालुक्यातील असंख्य नागरिक पुणे, पिंपरी-चिंचवड येथे प्लाज्मासाठी धडपड करत आहेत. जर मावळ तालुक्यात प्लाझ्मा सेंटर उभारले तर तालुक्यातील नागरिकांना वेळेवर प्लाझ्मा उपलब्ध होऊ शकतो, असे भेगडे म्हणाले.

या प्रसंगी भाजपचे तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, उपसभापती दत्ता शेवाळे, माजी सभापती गुलाबराव म्हाळस्कर, माजी उपसभापती शांताराम कदम, पंचायत समिती सदस्य सुवर्णा कुंभार, ज्योती शिंदे, बाळासाहेब घोटकुले व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.