Maval Corona Update: सलग तिसऱ्या दिवशीही सापडले रुग्ण, वेहेरगाव व चांदखेड येथील दोघे निघाले कोरोना ‘पॉझिटीव्ह’!

Maval: Corona patient found on the third consecutive day, youths from Vehergaon & Chandkhed tested 'positive' for COVID 19 अहिरवडे येथील आठ लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह 

एमपीसी न्यूज – मावळात आज सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. वेहेरगावमध्ये वास्तव्याला असलेल्या 28 वर्षीय तरुणाच्या तसेच चांदखेड येथील 48 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आज (गुरुवारी) दिली.

दरम्यान परवा अहिरवडे येथे मुंबईवरून आलेली व्यक्ती पॉझिटीव्ह आढळली होती. त्याच्या कुंटुबातील आठ व्यक्तींना पुण्यातील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या आठही व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे मावळ तालुका आरोग्य अधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

मावळच्या ग्रामीण भागात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्ण आढळल्यामुळे मावळात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या आधीचे हे दोन्ही रुग्ण मुंबईतून मावळात आलेले असल्याने मावळात आणखी कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईतून मावळात येणाऱ्यांवर प्रतिबंध घालण्याची मागणी करण्यात आली आहे.

वेहेरगाव येथील ही तरुण फेब्रुवारीमध्ये रोजगाराच्या उद्देशाने सोलापूरवरून येथे आला आहे. चांदखेड येथील व्यक्ती चार दिवसांपूर्वी खडकी येथे एका अंत्यविधीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी त्रास जाणवू लागल्याने त्यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब नमुना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला.

दरम्यान, तळेगाव येथील नर्स पाठोपाठ माळवाडी येथील नर्सनेही कोरोनावर मात केली असून तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
मावळातील अहिरवडे येथे दोन दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला. त्या पाठोपाठ आंदरमावळातील नागाथली येथे काल कोरोनाचा आणखी एक रुग्ण व आज सलग तिस-या दिवशी वेहेरगाव व चांदखेड गावात प्रत्येकी एक रूग्ण सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तालुक्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले असतानाच नवीन चार रुग्ण सापडल्याने तालुक्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चार झाली आहे.

वेहेरगाव व दहिवली कन्टेनमेंट झोन

कोरोना रुग्ण आढळल्यामुळे वेहेरगाव व दहिवली कन्टेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) म्हणून जाहीर करण्यात येत असल्याचा आदेश मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के यांनी आज काढले. वेहेरगावपासून पाच किलोमीटरच्या परिक्षेत्रातील देवघर, जेवरेवाडी व करंडोली ही गावे बफर झोनमध्ये राहतील, असे आदेशात म्हटले आहे.

वेहेरगाव येथे काल बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास  एका 28 वर्षीय तरुणाला त्रास होऊ लागल्याने औंध येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. त्या ठिकाणी झालेल्या कोरोना चाचणीचा अहवाल आज (गुरूवारी) प्राप्त झाला असून त्यात ती व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. ती व्यक्ती हाॅटेल कामगार आहे असे समजते.

त्यानंतर त्या व्यक्तीच्या जवळच्या संपर्कातील तीन व्यक्तींना आज (गुरूवारी) दुपारी पुण्याच्या ससून रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

अहिरवडे येथील आठजणांचे रिपोर्ट निगेटीव्ह

अहिरवडे येथील तीन दिवसापूर्वी मुंबईवरून आलेल्या 35 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्यां आठ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. निकटच्या संपर्कातील व्यक्तींच्या कोरोना चाचण्याही करवून घेण्यात आल्या. त्यात सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

तळेगावातील पहिल्या कोरोनाबाधित नर्सला बरी झाल्यानंतर गेल्या आठवड्यात डिस्चार्ज मिळाला. माळवाडीतील नर्सलाही  तीन दिवसांपूर्वी घरी सोडण्यात आले. त्यानंतर गेल्या तीन दिवसांत चार नवीन रुग्ण सापडल्याने मावळवासीयांची चिंता वाढली आहे.

गाव पातळीवर स्थापन करण्यात आलेल्या कोरोना नियंत्रण समितीच्या सदस्यांनी गावात येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवून संशयित कोरोना रुग्णांची माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी. त्यामुळे मावळातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे तालुका आरोग्य अधिकारी चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.