Maval Corona Update: मावळ तालुक्यात आज 8 रुग्णांची भर, सक्रिय रुग्णांची संख्या 77

Maval Corona Update: 8 more patients in Maval taluka today, number of active patients 77 तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 135 (शहरी- 55 व ग्रामीण-80) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज– मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे व लोणावळा येथील प्रत्येकी दोन, इंदोरी येथील 3 तर शिळाटणे येथील एक अशा एकूण 8 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात आत्तापर्यंत एकूण 135 (शहरी- 55 व ग्रामीण-80) जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 52 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या मावळ तालुक्यात 77 सक्रिय कोरोना रुग्ण असून मृत रुग्णांची संख्या 6 झाली आहे, अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने तालुकावासियांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. प्रशासनाने कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे.

दरम्यान, तळेगाव दाभाडे येथील लक्ष्मीबाग कॉलनीमधील राहणारी 54 वर्षीय व्यक्ती पुणे येथे एसटी महामंडळात नोकरीस आहे. ताप व खोकल्याचा त्रास होत असल्याने शुक्रवारी (दि.3) राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी स्वॅब घेण्यात आला होता. आज सकाळी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या निकटच्या संपर्कातील पाच व्यक्ती आहेत.

तळेगाव दाभाडे येथील 30 वर्षीय व्यक्ती मायमर मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये ड्युटी लागल्याने त्यांना संसर्ग झाला. पुणे येथील लॅबमध्ये गुरुवारी स्वॅब घेतला. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या उपचारासाठी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

नांगरगाव, लोणावळा येथील 62 वर्षीय व्यक्ती गुरुवारी (दि.2) रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यांच्या निकटच्या संपर्कातील 53 वर्षीय पत्नी व 26 वर्षीय सून यांचा शुक्रवारी स्वॅब घेण्यात आला होता. आज सकाळी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाॉझिटिव्ह आला आहे. उपचारार्थ राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्र कोविड केअर सेंटर तळेगाव येथे दाखल करण्यात आले.

इंदोरी मावळ येथील 18 वर्षीय युवक बुधवारी (दि.1) कोरोना बाधित आढळून आला होता. त्याच्या संपर्कातील 15 व 16 वर्षीय युवक त्याचे मित्र आहेत. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

इंदोरी येथील प्रतीकनगरमधील राहणारी 25 वर्षीय व्यक्ती कांदेवस्ती येथील रूग्णाच्या निकटच्या संपर्कातील होती. खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल होते. तेथे स्वॅब घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती न्यू हॉलंड कंपनीत नोकरीस आहे. कोविड केअर सेंटर तळेगाव येथे दाखल आहेत.

शिळाटणे येथील 45 वर्षीय व्यक्ती वाल्हेकरवाडी येथे आपल्या नातेवाईकांकडे राहण्यास गेले होते. तेथील त्यांचे नातेवाईक कोविड- 19 च्या तपासणीत पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांच्या निकटच्या संपर्कातील सदर व्यक्ती असल्याने त्यांचा स्वॅब शुक्रवारी बिर्ला हॉस्पिटल येथे घेण्यात आला होता. आज रोजी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.