Maval Corona Update: तळेगावमध्ये पहिल्या कोरोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद, मावळात नवीन सात रुग्ण

Maval Corona Update: Death of first Corona victim reported in Talegaon, seven new patients in Maval मावळात शुक्रवारी तळेगावमध्ये दोन, लोणावळ्यात एक तर वराळे येथे चार कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डाॅ चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील फ्लोरा सिटीमधील मुंबई (चेंबूर) येथून आलेल्या 70 वर्षीय मृत व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. तळेगावमध्ये नोंद झालेला हा पहिला कोरोनाबाधिताचा मृत्यू आहे. मावळ तालुक्यात यापूर्वी दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असल्याने तालुक्यातील कोरोनाबळीची एकूण संख्या तीन झाली आहे.  दरम्यान, आज तळेगावमध्ये दोन, लोणावळ्यात एक तर वराळे येथे चार अशा एकूण सात नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली.  

काल गुरूवारी कोरोनाबाधित आढलेल्या खळदेआळी येथील 18 वर्षीय भाजी विक्रेत्याच्या 25 वर्षीय भावाचा कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला असल्याचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड व तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ प्रवीण कानडे यांनी सांगितले.

मुंबई (चेंबूर) येथून 70 वर्षीय व्यक्ती 16 जून रोजी फ्लोरा सिटी येथील त्यांच्या फ्लॅटमध्ये राहायला आली होती. सदर व्यक्ती त्या दिवसापासून होम क्वारांटाइन होती. दरम्यान गुरूवार दि 25 रोजी पहाटे त्रास जाणवू लागल्याने डाॅ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालय केंद्राच्या कोविड केअर सेंटर दाखल करण्यात आले. पहाटे अडीच वाजता त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल आज शुक्रवारी (26) रोजी पाॅझिटिव्ह आला आहे.

सदर व्यक्तीच्या निकटच्या संपर्कातील 7 जणांना तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आज अखेर 21 पाॅझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी 6 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले असून सक्रिय रूग्णांची संख्या 13 आहे.एकाचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालल्याने तळेगावकरांच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक बाब आहे.

मावळातील कोरोनाबाधितांची शहरी 27 व ग्रामीण 48 अशी एकूण संख्या 75 झाली असून त्यापैकी 03 जणांचा मृत्यू झाला. 34 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रूग्णांची संख्या 38 आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली आहे.

मावळात  कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी केले आहे.

वराळे येथे एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची बाधा 

चिंचवड येथील एका गॅस एजन्सीमध्ये कामाला असलेला व वराळे येथे राहणाऱ्या कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या कुटुंबातील पत्नी (वय 42), भाऊ (वय 42), तसेच दोन मुली ( वय 19 व 14) अशा चारजणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची बाधा असल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांवर तळेगाव कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

लोणावळा येथील रेल्वे कॉलनी परिसरातील एका 57 वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.  दिनांक 24 जून रोजी संध्याकाळी श्वसनास व इतर त्रास होऊ लागल्याने तळेगाव जनरल हॉस्पिटल येथे ही महिला उपचारासाठी दाखल झाली .या रुग्णास अगोदरपासूनच यकृताचा (liver failure) आजार आहे. सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ आहे.

एकूण सात जण या महिलेच्या निकटच्या संपर्कातील आहेत. दोन मुलगे, दोन मुला व तीन नाती अशा सातजणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.