Maval : कोरोनाचा फटका डोंगरच्या काळ्या मैनेला 

Maval : Corona's blow to the karvande and jambolanum of the mountain

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे चवीने खाल्ला जाणारा गावरान मेवा म्हणजे ‘ डोंगरची काळी मैना’ करवंदे – जांभळे यापासून खवय्ये यावर्षी वंचित राहिले आहेत. त्यांच्यावर केवळ आठवणीवर खाण्याची इच्छा भागवण्याची वेळ आलेली आहे.

सह्याद्रीच्या डोंगर द-यात आढळणारी  आंबट-गोड करवंदे, जांभळे या गावरान फळांचा सध्या बहर सुरू आहे. यावर्षी हवामान चांगले असल्याने या फळांच्या झाडावर करवंदे – जांभळे प्रचंड प्रमाणात लगडलेली आहेत. लॉकडाऊनमुळे ती तोडायला जायला आणि बाजारपेठेपर्यंत न्यायला मोठी अडचण निर्माण झालेली आहे.

मावळ तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आंदर मावळ या डोंगर पट्ट्यातील खांडी, सावळा, कुसुर, कांबरे, डाहुली तसेच माळेगाव, पिंपरी, कुणे, अनुसूटे, कशाळ, तळपेवाडी, भोईरे, कल्हाट आदी  गावच्या  डोंगर उतारावर या गावरान मेव्याच्या काटेरी जाळ्या असून प्रचंड प्रमाणात त्याला करवंदे लगडलेली आहेत.

प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या एप्रिल, मे, जून महिन्यात करवंदाना चांगला बहार येतो. कडक उन्हाळा असल्याने शेतीची कामेही नसल्याने अनेकजण हि करवंदे तोडून बाजारात विक्रीसाठी नेऊन सिझनल व्यवसाय करून अल्पशी कमाई करत असतात.

हि करवंदे पुणे, लोणावळा, पिंपरी -चिंचवड, तळेगाव, वडगाव, कामशेत आदी ठिकाणी  डोक्यावर पाट्या घेऊन घरोघरी विक्री करतात. तर त्यांचे घरातील कुटुंबीय दिवसभर डोंगरीभागातील रानावनात जाऊन करवंदे तोडून आणण्याचे काम करतात. यातून दररोज पाचशे ते हजार रुपयांची कमाई त्या परिवाराला होत असते.

सध्या संपूर्ण मावळात लॉकडाऊन असल्यामुळे तसेच जमावबंदी, संचारबंदी असल्याने बाजारपेठा, दुकाने सर्व बंद आहेत.त्यामुळे करवंदाच्या पाट्या घेऊन विक्रीला जाणे हे बंद झाले आहे. तसेच बाजारपेठेपर्यंत येण्यासाठीची वाहतुकीची सर्व साधने वाहने बंद असल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. या व्यवसायातून आंदर मावळ विभागातील काही महिला व पुरुष मे आणि जून महिन्यात घरोघरी जाऊन विक्री करण्याच्या त्यांच्या  व्यवसायावर गंडांतर आले आहे. सध्या दोन महिने या डोंगराच्या मैनेमुळे  मिळणारा व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे.

या डोंगराच्या मैने बरोबरच पश्चिम पट्ट्यात जांभळाची झाडे विपुल प्रमाणात असल्याने काही जांभळे/आंबे घरोघरी जाऊन विकण्याचा व्यवसाय करणारी लोक कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे घरात अडकून पडले असून रोजी रोटीचे त्यांचे उत्पन्न  मात्र बुडाले आहे. आंबट-गोड चवीची करवंदे ,जांभळे मुबलक झाडावर असूनही खवय्यांना मिळणे कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे दुरापास्त झाले आहे. खवय्यांना केवळ आठवणी वरच राहणे कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे क्रम प्राप्त झालेले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.