Maval Crime News : कार्ला येथील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; पाच महिलांची सुटका

एका बंगल्यात मोक्कातील फरार गुंड चालवीत होता वेश्या व्यवसाय

एमपीसी न्यूज – कार्ला येथील बेंद्रेज हॉलिडे होममधील एका बंगल्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी छापा मारला. यातील प्रमुख आरोपी हा कुख्यात गुंड असून तो मोक्काच्या (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) गुन्ह्यात फरार होता. त्याच्यासह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्याचे अन्य तीन साथीदार पळून गेले.  यात पोलिसांनी पाच महिलांची सुटका केली आहे.

विठ्ठल महादेव शेलार (वय 32, रा. शिवतेजनगर, हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) असे अटक केलेल्या कुख्यात गुंडाचे नाव आहे. त्याच्यासह अशोक दादा खरात (वय 26, रा. गुजरवाडी, कात्रज, पुणे), राजु दशरथ बहिरे (वय 30, रा. अशिर्वाद कॉलनी, रहाटणी, पुणे) या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

अटक केलेल्या आरोपींसह त्यांच्या अन्य तीन साथीदारांवर याप्रकरणी भारतीय दंड सहिता कलम 370 (1), 188, 269, 270 व अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 3, 4, 5, 7(1) (ब) तसेच साथीचे रोग प्रतिबंध कायदा कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित काँवत यांना बुधवारी (दि. 5) रात्री माहिती मिळाली की, कार्ला गावच्या हद्दीत बेंद्रेज हॉलिडे होममधील अनिरुद्ध गांधी यांच्या बंगल्यामध्ये काहीजण वेश्या व्यवसायाचा धंदा करत आहेत. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित काँवत यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे एक पथक तयार करून दोन डमी ग्राहकांना या वेश्या व्यवसायाच्या ठिकाणी पाठवले.

वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री होताच पोलिसांनी बंगल्यावर छापा मारला. पोलिसांची चाहूल लागताच तिघेजण तिथून पळून गेले. तर तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींमध्ये कुख्यात गुंड विठ्ठल शेलार हा देखील होता. त्याच्यावर पोलिसांनी मोक्काची कारवाई केली असून तो त्यात फरार होता. फरार असताना तो वेश्या व्यवसाय चालवण्यासारखे धंदे करत होता. त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या कारवाईमध्ये पोलिसांनी तब्बल 44 लाख 32 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर पाच महिलांची सुटका केली आहे. गुंड विठ्ठल शेलार हा पीडित महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेत होता. तो प्रत्येक ग्राहकाकडून एक हजार रुपये घेत असल्याचे सुटका केलेल्या महिलांनी पोलिसांना सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नवनित काँवत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवालदार शकील शेख, कुतुब खान, पोलीस नाईक मयुर अबनावे, महिला पोलीस शिपाई रुपाली कोहिनकर, आश्विनी लोखंडे, पोलीस शिपाई स्वप्निल पाटील, रहिस मुलाणी, संतोष वाडेकर, हनुमंत शिंदे, भुषण कुवर, सुभाष शिंदे, अंकुश पवार, होमगार्ड शंकर खेंगरे, अनिकेत पाटील यांच्या पथकाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.