Maval crime News : जांभूळ येथील व्हिजन सिटीमध्ये चार्टर्ड अकाऊंटंटची गळफास घेऊन आत्महत्या

नोकरी करताना गुन्हा दाखल झाल्याने दुसरी नोकरी मिळत नसल्याचा मजकूर असलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील जांभूळ येथील व्हिजन सिटी येथील रो हाऊसमध्ये एका चार्टर्ड अकाऊंटंटने गळफास लाऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 13) सायंकाळी साडेसात वाजता उघडकीस आली.

विनयकुमार मुकुदंराव भांबुर्डेकर (वय 39, रा. आकुर्डी. सध्या रा. रो हाउस नं 07, व्हिजन सिटी, जांभूळ, ता मावळ) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याप्रकरणी प्रसाद मुकुंदराव भांबुर्डेकर (वय 43, रा. विवेकनगर, आकुर्डी) यांनी  वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 13) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी प्रसाद यांचा मोठा भाऊ विनयकुमार यांनी सांगितले की, माझी दिवसभरात दोन कामे आहेत. ती झाली की मी तुझ्याकडे जेवायला येतो. त्यानंतर आपण आपल्या जांभूळ येथील रो हाऊसवर जाऊ. तिथून तुझ्या जांभूळ येथील फ्लॅटवर देखील जाऊ, मात्र, विनयकुमार दुपारी जेवायला घरी आले नाहीत. प्रसाद यांनी फोन करण्याचा प्रयत्न केला असता विनयकुमार यांचा फोन बंद लागला.

त्यामुळे प्रसाद त्यांच्या एका नातेवाईकासोबत जांभूळ येथील विनयकुमार यांच्या रो हाउसवर गेले. रो हाउस समोर विनयकुमार यांची गाडी होती.

घराचा दरवाजा उघडा होता. घरात दुस-या मजल्यावरील फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. विनयकुमार यांचे शरीर थंड पडले होते. जवळच विनयकुमार यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.

‘यापूर्वीचे काम करत असताना विनयकुमार यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांना इतर कंपनीमध्ये नोकरी मिळत नव्हती.’ असे चिठ्ठीत लिहिले आहे. वडगाव मावळ पोलीस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

दरम्यान, विनयकुमार यांनी त्यांचे व्हाटस अप स्टेटस ‘फायनली आर एच 07’ असे ठेवले होते. याचा अर्थ काय? यातून त्यांना काय सांगायचे होते, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. विनयकुमार पुण्यातील एका खासगी कंपनीत चार्टर्ड अकाऊंटंट म्हणून काम करत होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.