Maval Crime News : बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर वडगाव मावळ पोलिसांचा छापा; एकास अटक

एमपीसी न्यूज – बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखान्यावर वडगाव मावळ पोलिसांनी धाड टाकून मुद्देमालासह मुख्य सूत्रधाराला अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 5) सायंकाळी फिडेक्स कंपनी पाठीमागे महेश कुडे यांच्या गोडाऊनच्या समोर, वडगाव मावळ येथे करण्यात आली. आरोपीला वडगाव मावळ न्यायालयाने गुरुवारी (दि. 9) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधन सामुग्री व कार असा एकूण 11 लाख, 98 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीकांत बाळू चांदेकर वय 32 रा. ढोरे वाडा, वडगाव मावळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची निर्मिती, साठवण, विक्री व वाहतूक करण्यासाठी बंदी असताना, वडगाव मावळ हद्दीत बनावट गुटखा बनवणाऱ्या कारखाना सुरू करुन बनावट गुटखा बनवून वितरण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्याने घटनास्थळी पोलीस उप निरीक्षक विजय वडोदे, पोलीस हवालदार श्रीशल्य कंटोळी, मनोज कदम, कैलास कदम आदींनी हजर राहून पाहणी केली असता, बनावट गुटखा बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, यंत्र साधनसामग्री चार चाकी एम एच 13 जी वाय 2013 तसेच आरोपी श्रीकांत चांदेकर रंगेहात सापडला.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सोमवारी (दि.6) दुपारी 2 वा. वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता, गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी न्यायाधीशांनी आरोपी चांदेकर याला गुरुवारी (दि.9) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय वडोदे करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.