Pavana Dam News : पिंपरी-चिंचवडला पाणी पुरविणारे पवना धरण 98 टक्के भरले

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

एमपीसी न्यूज – पवना धरण क्षेत्रात शनिवारी (दि. 29) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पावसाचा जोर वाढल्याने पवना धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 82 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 3.56 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण 98 टक्के भरले आहे.

31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. 1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 543 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 62.71 टक्के वाढला आहे.

गेल्या 24 तासात 82 मिलिमीटर पाऊस पडला आहे. डोंगराळ भागातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे. त्यामुळे मागील 24 तासात पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 3.56 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मागील वर्षी आजच्या तारखे पर्यंत 3 हजार 154 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. तर धरणातील पाणीसाठा 100 टक्के होता.

शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत पवना धरण 96 टक्के भरले. रात्री देखील पाण्याची आवक सुरू राहिली. त्यामुळे आणखी दोन टक्के पाणीसाठा वाढला. आज धरणात 98 टक्के पाणीसाठा आहे.पवना नदीपात्रात रविवारी सकाळ पासून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी तीन हजार क्युसेकने विसर्ग सुरु होणार आहे.

नदीचे पाणी वाढले तर नदीकाठच्या गावांना त्याचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नदीकिनारी असलेली सर्व साधन सामुर्गी, वाहने व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यावेत. पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना देखील प्रशासनाने केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.