Vadgaon Maval : राष्ट्रवादीत फूट पडून खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे दत्तात्रय केदारी

उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे रोहिदास गराडे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादीत फूट पडून एका गटाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे मावळ तालुका खरेदी- विक्री संघाच्या अध्यक्षपदी भाजपाचे दत्तात्रय केदारी यांची बिनविरोध निवड झाली. आणि भाजपाला पाठिंबा दिल्याच्या मोबदल्यात राष्ट्रवादीच्या एका गटाचे रोहिदास गराडे यांच्या पदरात मात्र उपाध्यक्षपद पडले.

गुरुवारी (दि 10 जानेवारी) झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दुस-या गटाने डाव उलटवून लावत भाजपाशी तडजोड करून दोन्ही पदांची वाटाघाटी केली. दोन्ही पदासाठी प्रत्येकी एक- एक अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी केदारी व उपाध्यक्षपदी गराडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे सहाय्यक निबंधक सूर्यवंशी यांनी जाहीर केले.

मावळ तालुका खरेदी- विक्री संघावर राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत असताना संचालकातील मतभेदांतून संघाचे मावळते अध्यक्ष प्रकाश पवार व उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांच्या निवडीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब भानुसघरे, भाऊसाहेब मावकर, दत्तात्रय गोसावी व मनीषा आंबेकर यांनी राष्ट्रवादीच्या इतर संचालकांशी झालेल्या मतभेदातून भाजपच्या पाच संचालकांशी हातमिळवणी करून वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी झाला होता.

यावेळी संचालक पंढरीनाथ ढोरे, दत्तात्रय शिंदे, मारूती खांडभोर, ज्ञानेश्वर गोणते, खंडू जाधव, चंद्रभागा तिकोणे, रवींद्र घारे, सोपान खांदवे, बाळासाहेब पवार, बाळासाहेब ढोरे उपस्थित होते. राष्ट्रवादीच्या इतर चार संचालकासह स्वाभिमानी रिपाइचे नितीन साळवे गैरहजर राहिले.

निवडीनंतर मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे, पंचायत समितीचे सदस्य, गटनेते दत्तात्रय शेवाळे, भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष रवींद्र घारे, संचालक पंढरीनाथ ढोरे, दत्तात्रय शिंदे आदींनी त्यांचा सत्कार केला.

पक्षीय बलाबल- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व स्वाभिमानी रिपाइ मिळून तेरा सदस्य असून भाजपाचे फक्त पाच सदस्य आहेत. तरीही अध्यक्षपदी भाजपाने बाजी मारली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.