Maval: लोकसभेसाठी बाळा भेगडे किंवा दिगंबर भेगडे यांना उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांचा आग्रह

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीला शिवसेना-भाजपची युती होण्याची शक्यता नाही. त्यामुळे लोकसभेला भाजपचा उमेदवार मावळातीलच देण्याची मागणी पुढे येऊ लागली आहे. मावळात भाजपकडून दोन वेळेसच आमदारकीची संधी दिली जाते. दिगंबर भेगडे दहा वर्ष आमदार होते. आता बाळा भेगडे गेल्या साडे आठ वर्षांपासून आमदार आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला लोकसभेची उमेदवारी देऊन बढती देण्याची मागणी कार्यकर्त्यांकडून जोर धरु लागली आहे. मावळ मतदार संघात भाजपला आणि भेगडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास याचा भाजपला फायदा होऊ शकतो, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

लोकसभा निवडणुकीला केवळ सात ते आठ महिन्याचा अवधी राहिला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. मावळ लोकसभा मतदार संघाची 2009 मध्ये पुनर्रचना करण्यात आली. युतीत मावळ लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे सन 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत युतीचा म्हणजेच शिवसेनेचा उमेदवार निवडून आला आहे. 2009 ला गजानन बाबर आणि 2014 मध्ये श्रीरंग बारणे निवडून आले आहेत. दोन्हीवेळा भाजप-शिवसेनेची युती होती. त्याचा फायदा शिवसेनेला झाला.

आता शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे मावळात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून मावळतून भाजपचा आमदार निवडून येतो. मावळ लोकसभा मतदार संघ हा मोठा मतदार संघ आहे. या मतदार संघाचा भाग नवी मुंबईपर्यंत येतो. या मतदार संघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. पिंपरी, चिंचवड, मावळ, उरण, पनवेल आणि कर्जत-खालापूर यामध्ये तीन मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर, दोन मतदार संघात शिवसेनेचे आणि एका मतदार संघात राष्ट्रवादीचा आमदार आहे. तसेच पिंपरी-चिंचवड, पनवेल महापालिकेत, तळेगाव दाभाडे, लोणावळा नगरपरिषेदत, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात भाजपची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपची अधिक ताकद आहे.

_MPC_DIR_MPU_II

सन 2009 च्या लोकसभेला शिवसेनेचे गजानन बाबर आणि राष्ट्रवादीचे आझम पानसरे हे दोन्ही उमेदवार पिंपरी-चिंचवड शहरातील होते. 2014 च्या लोकसभेला शिवसेनेचे बारणे, शेतकरी कामगार पक्ष, मनसेच्या पाठिब्यांवर लढलेले लक्ष्मण जगताप दोघेही शहरातीलच होते. तर, राष्ट्रवादीने अॅड. राहुल नार्वेकर यांना आयात केले होते. त्यामुळे यावेळी मावळतीलच उमेदवार असावा अशी मावळवासियांकडून मागणी केली जाऊ लागली आहे.

दिगंबर भेगडे दहा वर्ष मावळचे आमदार होते. तर 2009 पासून बाळा भेगडे सलग दुस-यावेळेस आमदार आहेत. त्यामुळे आता लोकसभेला दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्याची मागणी जोर धरु लागली आहे. मावळ मतदार संघात भाजपला आणि भेगडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे या दोघांपैकी एकाला उमेदवारी दिल्यास याचा भाजपला फायदा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, मावळ लोकसभा मतदार संघाची उमेदवारी मिळविण्यासाठी भाजपमध्ये तीव्र स्पर्धा आहे. संभाव्य उमेदवार म्हणून चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिले जात आहे. दोघेही दुस-या पक्षातून भाजपमध्ये आले आहेत. त्यातच मावळचे आमदार बाळा भेगडे किंवा माजी आमदार दिंगबर भेगडे या दोघांपैकी एकाला लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी मावळातून जोर धरु लागली आहे. हे दोघेही पक्षाचे निष्ठावान आहेत. त्यामुळे मावळातील लोकसभा उमेदवारीवरुन भाजपमध्ये मोठा पेच निर्माण होणार असल्याची, ही चिन्हे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.