Maval : व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई – सुनंदा भोसले पाटील

घरगुती सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्या गॅस एजन्सींचे परवाने रद्द करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात व्यावसायिक कारणांसाठी राजरोसपणे घरगुती गॅस सिलेंडर वापरण्यात येत असल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ते व पुणे जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी तहसीलदार कार्यालयाकडे तक्रार केली आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा काळा बाजार करणाऱ्या गॅस एजन्सींचा परवाना रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांनी दिले.

मावळ तालुक्यात अनेक छोटे-मोठे हॉटेल, स्वीट मार्ट व्यावसायिक व कारखानदार राजरोजपणे कमी दरातील घरगुती गॅस सिलिंडरचा बेकायदेशीरपणे वापर करत असल्याची तक्रार प्रदीप नाईक यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नायब तहसीलदार सुनंदा भोसले पाटील यांना निवेदन दिले आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर जास्त असल्याने सवलतीच्या दरातील घरगुती सिलिंडरचा वापर हॉटेलचालक, स्वीट मार्टचालक तसेच काही कारखानदार करीत असून त्यांना तळेगाव तसेच मावळातील अन्य गॅस एजन्सीकडून बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्यात येत असल्याचा आरोप नाईक यांनी केला आहे.

गरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनामार्फत घरगुती गॅस सिलिंडर सवलतीच्या दरात देते तसेच त्यावर ग्राहकांना अनुदानही देते. जास्तीत जास्त लोकांना घरगुती गॅस सिलिंडर मिळावा, अशी शासनाची भूमिका आहे, तथापि हे घरगुती सिलिंडर सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याऐवजी व्यावसायिकांना काळ्या बाजारात चढ्या दराने विकून गॅस एजन्सीचालक नफेखोरी करीत आहेत, असा आरोप नाईक यांनी केला आहे. यात शासनाची फसवणूक होत असल्याने या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी गॅस एजन्सी चालकांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

व्यावसायिक कारणांसाठी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करणे बेकायदेशीर असून घरगुती गॅस सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच संबंधित गॅस एजन्सी चालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सुनंदा भोसले पाटील यांनी दिले. व्यावसायिकांनी घरगुती सिलिंडरचा वापर करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणी चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.