Maval: खासदार आप्पा अन्‌ आमदार भाऊ यांच्यातील आरोप-प्रत्योराप लोकनाट्य तमाशा होता काय? – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव यांनी केंद्र सरकारच्या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले होते. आता स्वार्थासाठी बारणे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तर, खासदार आढळराव यांनी आमदार महेश लांडगे यांच्या पायी अक्षरशः लोटागण घातले. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधातील दोन्ही खासदारांचा लढा बोगस होता, असा आरोप करत जनता खासदार, आमदारांना माफ करणार नाही, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी म्हटले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भापकर यांनी म्हटले आहे की, खासदार बारणे यांनी पंतप्रधान आवास योजना ही घरे देण्यासाठी की घरे भरण्यासाठी? रस्ते विकासाच्या कामात भाजपाचा 90 कोटीचा घोटाळा, लक्ष्मण जगताप यांना सत्तेची धुंदी, टीडीआर माफिया, नदीपात्र चोर म्हणून जगताप यांच्यावर जाहीर आरोप केले होते. तर, आमदार लक्ष्मण जगताप यांनी खासदार श्रीरंग बारणे यांचा श्रीरंग हा नटरंग आहे, माती चोर आहे, बारणेंनी प्राधिकरणांचे भूखंड ढापले, फोटोवाला खासदार, मावळचा मावळता खासदार, लोकसभा निवडणुकीत बारणेंना जनताच घरी बसवेल, अशी शेलकी विश्वलेशने वापरुन जहरी टीका केली होती.

  • आता लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर खासदार बारणे यांनी आपली खुर्ची वाचविण्यासाठी जगताप यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहेत. तर, तिकडे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार महेश लांडगे यांच्या पायी अक्षरशः लोटागण घातले. याचा सरळा अर्थ आहे की, भ्रष्टाचाराच्या विरोधातील खासदारांचा लढा बोगस होता. मागील दोन वर्षातील शहरातील भ्रष्टाचारांच्या आरोपांचे मनोमिनल झाले आहे. आता त्यातील हिस्सेदारीच्या टक्केवारीचे प्रमाण व लेखाजोका खासदार व आमदार यांनी जाहीर करावा, असे भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.