Maval : श्रीरंग बारणे स्वकर्तृत्वावर बनले देशाच्या संसदेतील सर्वोत्तम खासदार – महापौर डॉ. कविता चौटमल

एमपीसी न्यूज – कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या श्रीरंग बारणे यांनी जनमनावर राज्य केले. केवळ जनतेच्या मनावरच नाही तर देशाच्या संसदेत अतुलनीय काम करून सर्वोत्तम खासदार होण्याचा बहुमान मिळवला आहे. सलग पाच वेळा खासदार श्रीरंग बारणे यांचा संसदरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे, असे गौरवोद्गार पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविता चौटमल यांनी काढले.

पनवेल तालुक्यात रविवारी (दि. 31) तळोजा मजकूर, खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, पनवेल आदी ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या. या सभांमध्ये उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना महापौर डॉ. कविता चौटमल बोलत होत्या. यावेळी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौटमल, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, विक्रांत पाटील, नगरसेवक अमर पाटील, विद्या गायकवाड, बबन पाटील, राजू शर्मा, संपर्क प्रमुख दत्ता दळवी, किशोरी पेडणेकर, सभागृह नेते परेश ठाकूर, रवी ठाकूर, अरुण भगत, रत्ना घरत, प्रभाकर गोवारी, डॉ. अरुण कुमार भगत, अनिल चव्हाण, रामदास शेवाळे, कल्पना राऊत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते.

महापौर डॉ. कविता चौटमल म्हणाल्या, “खासदार श्रीरंग बारणे हुशार, अनुभवी आणि अभ्यासू खासदार आहेत. त्यांच्यासारखा चांगला उमेदवार पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून जायला हवा. पनवेल आणि परिसरातील सर्व मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. सर्वांमधून श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा एकदा खासदार बनविण्याचा सूर येत आहे. हा उत्साह विजयाची साद देत आहे”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने मागील पाच वर्षात सर्व स्तरातील नागरिकांसाठी विविध योजना राबविल्या. योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी हे या सरकारचे यश आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन ‘स्वच्छ भारत’चा नारा दिला. उज्वला योजना, उडान योजना, अटल पेंशन योजना, जनधन योजना यांसारख्या कित्येक योजना आणि त्याचा लाभ थेट नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. त्यामुळे अशाच प्रकारचे सक्षम सरकार पुढील काळात देखील सत्तेत असायला हवे” यासाठी सर्व मतदार महायुतीच्या उमेदवाराला निवडून देणार आल्याचे आश्वासन महापौरांनी दिले.

मागील काही वर्षांपूर्वी पनवेल शहर विकासाच्या प्रतीक्षेत होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून एक सक्षम आमदार या शहराला मिळाला आणि शहर विकासाची वाटचाल करू लागले. महापालिका झाल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून देखील विकास करण्याचे काम सुरू आहे. वर्षभरात महापालिकेच्या माध्यमातून सुमारे 150 कोटींची विकासकामे केली आहेत. ही विकासगंगा अविरत सुरू राहण्यासाठी महायुतीचेच सरकार असायला हवे, असेही महापौर डॉ. कविता चौटमल म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.