Maval: गोळीबारात जखमी फार्म हाऊस व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : – मावळ तालुक्यातील वाहनगावजवळ 22 जुलैला मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या फार्म हाऊस व्यवस्थापकाचा उपचारादरम्यान आज (बुधवारी) रात्री पावणेआठच्या सुमारास पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मृत्यू झाला. वडगाव पोलिसांनी या प्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

मिलिंद मणेरीकर (वय 50, रा. तळेगाव दाभाडे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वाहनगावजवळ संकल्प फार्म हाऊस येथे ते व्यवस्थापक म्हणून काम करीत होते. गोळीबाराच्या घटनेला आठवडा झाला तरी या प्रकरणामागील कारण अथवा आरोपींची नावे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद मणेरीकर हे वाहनगाव जवळ असलेल्या संकल्प फार्म हाऊस येथे व्यवस्थापक म्हणून काम करत होते. मणेरीकर 22 जुलैला सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांचे सहकारी चेतन निमकर यांच्यासोबत कारमधून फार्महाऊसवर जात होते.

वाहनगावजवळ गेले असता त्यांच्या कारच्या मागून एका मोटारसायकल वर अज्ञात दोघेजण आले. त्यांनी तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्यांच्या दुचाकीला नंबर प्लेट देखील नव्हती.

त्यांनी मणेरीकर यांच्या कारला हात दाखवून थांबवले. मणेरीकर यांना हांडी फार्म हाऊस कुठे आहे, असे आरोपींनी विचारले. त्यांना हांडी फार्म हाऊसचा पत्ता सांगण्यासाठी मणेरीकर यांनी कारची काच खाली घेतली. त्यानंतर आरोपींनी मणेरीकर यांच्यावर गावठी कट्ट्याने गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये मणेरीकर यांच्या पोटात तीन गोळ्या लागल्या आहेत. ते गंभीर जखमी झाले असून त्यांना नजिकच्या रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली, परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविण्यात आले. त्या ठिकाणी आज रात्री त्यांचा मृत्यू झाला.

वडगाव मावळ पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share