BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : भाजपला दुप्पट मताधिक्य दिल्यास मावळला मंत्रिपद नक्की – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज – आपल्याला समृद्ध महाराष्ट्र बनवायचा आहे. त्यासाठी बाळा भेगडे यांच्या रुपाने शिवबाचा मावळा मला द्या. भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीला मागील निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य द्या, मी मावळला राज्यमंत्री नाही तर मंत्रिपद नक्की देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केले. 

मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-आरपीआय महायुतीचे उमेदवार संजय तथा बाळा भेगडे यांच्या प्रचारार्थ तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे पाटील शाळेच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आपल्या सुमारे २५ मिनिटांच्या भाषणात फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शरद पवार, राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष रसातळाला गेले असून यावेळी त्यांचा जागांचा नीच्चांक नोंदविला जाईल, असे भाकित त्यांनी केले.

व्यासपीठावर उमेदवार बाळा भेगडे,  खासदार श्रीरंग अप्पा बारणे, आमदार प्रसाद लाड, माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी आमदार रूपलेखा भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, पुणे जिल्हा आरपीआय अध्यक्ष  सूर्यकांत वाघमारे,तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, प्रचार प्रमुख  रवींद्र भेगडे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मावळ सभापती सुवर्णा कुंभार,माजी नगरसेवक चंद्रकांत शेटे, लोणावळा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी सभापती  एकनाथ टिळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे,  शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर, भारत ठाकूर, शरद हुलावळे, गुलाब म्हाळसकर,शांताराम कदम, देहूरोड कॅन्टोन्मेट बोर्डाचे उपाध्यक्ष  रघुवीर शेलार, सुकनशेठ बाफना, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, नगरसेवक सुशील सैंदाणे, तळेगाव शहर अध्यक्ष संतोष दाभाडे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या १५ वर्षांच्या कार्यकाळातील हिशेब द्यावा, आम्ही आमच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील हिशेब देतो. तो १५ वर्षांच्या तुलनेत कित्येक पटींनी जास्त आहे. सर्वात जास्त रोजगार महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे प्रत्येक हाताला रोजगार मिळणार आहे. येत्या पाच वर्षात एक कोटी तरुणांना नोकऱ्या दिल्या जातील. बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे आणखी सक्षमीकरण केले जाईल. शिक्षण आणि आरोग्य सुविधांबाबत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याला प्रथम क्रमांकावर आणण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.

मावळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि बाळा भेगडे हे विक्रमी मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. मावळातील क्षेपणास्त्र विकास प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांना केंद्र शासनामार्फत वाढीव मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. तळेगावच्या विकासासाठी माझ्या माध्यमातून ३०० कोटींची विकासकामे मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले. गावठाणातील अनधिकृत बांधकामे नियमित केली जाणार आहेत.

बाळा भेगडे म्हणाले की, गद्दारी कुणाच्या रक्तात आहे. हे मावळच्या जनतेला ठाऊक आहे. तालुक्यात आपण 1400 कोटी रुपयांची कामे केली. तरुणांना रोजगार निर्माण करणारा तालुका म्हणून महाराष्ट्रात अग्रेसर असणार आहे.  मेट्रो चालू करण्याचे स्वप्न मावळ तालुका पाहतो आहे. या वर्षी नवा विक्रम होणार आहे. मावळची जनता सलग तिसऱ्यांदा आपल्याला सेवेची संधी देणार आहे. कमळाला एवढे मतदान करा की, घडयाळ बारामतीलाही राहिले नाही पाहिजे.

गणेश भेगडे म्हणाले की, विचारसरणी हृदयात आणि डोक्यात असावी लागते. शासनाचा निधी खेचून आणण्यासाठी आमदार, खासदार यांची गरज असते. खिशातून पैसा टाकून खर्च करायचा नसतो. त्यासाठी उमेदवार शिकलेला असावा. जनतेने कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका, युतीचेच सरकार येणार आहे. आपल्या राज्यमंत्र्याला कॅबिनेट मंत्री करायचे आहे.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार दिगंबर भेगडे तसेच सुरेखा जाधव, राजू खांडभोर, प्रशांत ढोरे, चित्रा जगनाडे, रवींद्र भेगडे, भास्कर म्हाळसकर, सूर्यकांत वाघमारे आदींची भाषणे झाली. संतोष हरीभाऊ दाभाडे यांनी स्वागत केले. संदीप काकडे यांनी आभार मानले. बाबूलाल गराडे यांनी सूत्रसंचालन केले.

 

HB_POST_END_FTR-A2

.