Maval: रायगडमधून पार्थ पवार यांना अधिक मताधिक्य देऊ -शेकापचे नेते जयंत पाटील (व्हिडिओ)

नेते सोडून गेले; पण कार्यकर्ते 'शेकाप'सोबतच 

एमपीसी न्यूज – मावळ लोकसभा मतदारसंघात येत असलेल्या उरण, पनवेल, कर्जत या परिसरात शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) मोठे वर्चस्व आहे. अनेक मोठे नेते सोडून गेले असले. तरी, त्याचा शेकापला काहीच फरक पडत नाही. कारण, तळगाळात काम करणारे कार्यकर्ते आमच्या सोबत आहेत. त्यामुळे शेकापची ताकद कायम असून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना गेल्या निवडणुकीपेक्षा घाटाखालील तीनही मतदारसंघातून अधिक मताधिक्य देऊ, असे शेकापचे सरचिटणीस, आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच रामशेठ ठाकूर यांचा रायगड परिसरात परिणाम दिसून येत नसून ते प्रत्येक निवडणुकीवेळी पक्ष बदलत असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला. 
शेतकरी कामगार पक्षाची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसोबत आघाडी झाली आहे. चिंचवड, डांगे चौक येथे शेकापचा आज (शनिवारी)मेळावा झाला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील, शेकापचे कोषाध्यक्ष राहुल पोफळे, शहराध्यक्ष नितीन पाटील उपस्थित होते. मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार पार्थ पवार यांना गेल्यावेळी पक्ष घाटाखालून जास्त मताधिक्य देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
  • पुरोगामी विचारांच्या मतांची विभागणी होऊ नये यासाठी शेकापने काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत कोणत्याही अटी-शर्तीविना आघाडी केल्याचे स्पष्ट करत जयंत पाटील म्हणाले, ”रायगड परिसरात आमच्या पक्षाचे वर्चस्व आहे. अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आमचे आहेत. खालापूर, खोपोली नगरपरिषद आमच्या ताब्यात आहे. त्यामुळे काहीजण सोडून गेल्याचा आम्हाला फरक पडत नाही. रामशेठ ठाकूर यांचा रायगड परिसरात परिणाम दिसून येत नाही. घाटाखाली पावणे पाच लाख मते आहेत. गेल्यावेळी 25 हजारांचा मताधिक्य दिले होते. यावेळी त्यापेक्षा अधित मताधिक्य देणार आहोत”.
”गेल्या लोकसभा निवडणुकीला दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन खासदार पूर्ण करु शकले नाहीत. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न प्रलंबित आहे. रेडझोनचे भिजत घोंगडे कायम आहे. केवळ लोकसभेत प्रश्न विचारुन उपयोग नाही. त्यातील सुटले किती हे महत्वाचे आहे”, असेही जयंत पाटील म्हणाले. शरद पवार, अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरा-मोहरा बदलला. शहरात आल्यावर युरोपमध्ये आल्यासारखे वाटत होते. परंतु, आता शहरात आल्यावर झोपडपट्टीत आल्यासारखे वाटते. सर्वत्र कच-याचे ढीग दिसत आहेत. स्मार्ट सिटीची अवस्था दयनीय झाल्याचे सांगत महापालिकेतील सत्ताधारी भाजपवरही त्यांनी टीका केली.
  • केंद्र सरकावर टीका
  • केंद्र सरकारच्या गेल्या पाच वर्षाच्या राजवटीत स्वायत्त संस्था धोक्यात आल्या आहेत. इतिहासात पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश माध्यमांसमोर आले. पाच वर्षात रिझर्व्ह बँकेचे चार गर्व्हनर बदलले आहेत.  विद्यमान गर्व्हरनर राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.  2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजप नेते विकासकामांवर बोलत होते. विकासकामांवर भर दिला होता. पाच वर्षात एकही आश्वासन पूर्ण करु शकले नाहीत. त्यामुळे आता धर्मावर बोलू लागले आहेत. जेव्हा गरज वाटेल तेव्हा राम मंदिराचा मुद्दा काढला जातो अन्‌ गरज संपली की रामाचा विसर पडतो, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली.
 …..म्हणून शेकाप काँग्रेससोबत 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. परंतु, विद्यमान राज्यकर्ते भारताचे संविधान ब्रिटिश पार्लमेंटची ‘डुप्लीकेट’ कॉपी असल्याचे सांगत संविधान बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे पुरोगामी असलेल्या काँग्रेससोबत शेकापने आघाडी केल्याचे पाटील यांनी सांगितले. काँग्रेससोबत आमची वैचारिक लढाई होती. पुन्हा त्यांच्यासोबत लढाई होईल, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III