BNR-HDR-TOP-Mobile

Maval : रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पीडीसीसीच्या कर्मचाऱ्यांना जुंपले निवडणूक प्रचाराला

खासदार श्रीरंग बारणे यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

949
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताब्यातील रयत शिक्षण संस्था, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (पीडीसीसी) या तिन्ही संस्थांमधील कर्मचारी व शिक्षकांना मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराच्या कामाला जुंपण्यात आले असून निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी लेखी मागणी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांबरोबरच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, पुणे व रायगडचे जिल्हाधिकारी तसेच पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांना खासदार बारणे यांनी यापूर्वीही याबाबत तक्रार दिली होती. त्यानंतरही संबंधितांवर कोणतीही कारवाई करण्यात न आल्याने बारणे यांनी पुन्हा तक्रार केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. या तिन्ही संस्थांचे कर्मचारी व शिक्षक मावळ लोकसभा मतदारसंघात प्रचाराचे काम करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार यांची पत्रके मतदारांपर्यंत पोहचविणे, माहिती गोळा करणे, मतदारांना प्रलोभन दाखविणे आदी कामे करीत आहेत. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असून सर्व संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बारणे यांनी निवेदनात केली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवार यांचे नातू व अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे निवडणूक लढवत आहेत. पवार कुटुंबातील सदस्य निवडणुकीला उभा असल्याने संपूर्ण पवार कुटुंबाने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. प्रचारासाठी पुरेसे कार्यकर्ते मिळत नसल्याने अधिकाराचा गैरवापर करीत पवार कुटुंबाने त्यांच्या ताब्यातील संस्थांमधील कर्मचारी व शिक्षक पार्थ यांच्या प्रचाराला जुंपले आहेत, असा आरोप बारणे यांनी केला आहे.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3