Maval: पवना धरणाची उंची एक मीटरने वाढणार; महापालिका खर्च करणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या वाढीव पाण्याची गरज भागविण्यासाठी पवना धरणाची उंची एक मीटरने वाढविण्यात येणार आहे. या कामाचा खर्चही महापालिकेने राज्य सरकारकडे जमा केला आहे. धरणाची उंची वाढविल्याने पिंपरी – चिंचवडकरांना एक टीएमसीने पाणीपुरवठा वाढणार आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पिण्यासाठी तसेच औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरविले जाते. गेल्या काही वर्षात पिंपरी-चिंचवडच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली. परिणामी त्याचा ताण पाणीपुरठ्यावर पडू लागला. लोकसंख्या वाढून भविष्यात शहरात पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पवना धरणाचा पाणीसाठा वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी पवना धरणाची उंची एक मीटरने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर धरणाची सध्याची पाणीसाठवण क्षमता 10.76 वरून 11.94 टीएमसी एवढी वाढणार आहे. म्हणजेच धरणातील पाणीसाठा एक टीएमसीने वाढणार आहे.

धरणाची उंची वाढविल्यामुळे पाण्याचा फुगारा वाढणार असला. तरी, त्यामुळे एक इंचही जमीन बाधीत होणार नाही, हे या कामाचे वैशिष्ट्ये आहे. धरण बांधल्यानंतर किरकोळ डागडुजी वगळता मजबुतीकरणाचे काम झाले नाही. त्यामुळे धरणातून मोठी गळती होत होती. ही गळती थांबवून धरण मजबुत करण्यात आले. पिंपरी – चिंचवड महापालिकेला पवना धरणातून दरदिवशी 480 दशलक्ष लीटर पाणी पुरविण्यात येते. शहराला सन 2025 पर्यंत किती पाणी लागेल याचा आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार, पवना धरणातून पिंपरीला 550 दशलक्ष लिटर पाणी देण्याचे नियोजन आहे.

पवना धरणाला कालवा नाही, हे त्याचे एक वेगळेपण आहे. धरणासाठी 17 गावे विस्थापित करावी लागली. त्यावेळी पुनर्वसन कायदा अस्तित्वात नव्हता. तथापि, या धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्यात आले. धरणामुळे विस्थापित झालेल्या 1 हजार 203 प्रकल्पग्रस्तांपैकी 320 धरणग्रस्तांना जमिनी देण्यात आल्या आहेत. उर्वरीत धरणग्रस्तांचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे.

अशी आहे पवना धरणाची संक्षिप्त माहिती

नदीचे नाव – पवना
धरणाचा उद्देश – वीज व पिण्यासाठी
पाणलोट क्षेत्र – 113 चौरस किलोमीटर
पर्जन्यमान – 2030 मिलिमीटर
बांधकाम सुरू – 1966
बांधकाम पूर्ण – 1972
धरणाची उंची – 42 मीटर
धरणाचा प्रकार – माती व चिरेबंदी
प्रकल्पीय साठा – 10.76 टीएमसी
उपयुक्त साठा – 9.67 टीएमसी
बुडीत क्षेत्र – 2365 हेक्टर (गावे 17 )
लाभ क्षेत्र – 5943 हेक्टर
लाभार्थी गावे – 33

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.