Maval: बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात?; मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांचा अंदाज

पुसाणे गावाजवळ केली होती बिबट्याची शिकार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पुसाणे गावाजवळ झालेल्या बिबट्याच्या शिकारीमागे परराज्यातील टोळीचा हात असावा, असा संशय मावळातील प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा वनविभागाने सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच मावळात पुन्हा कोणत्याही वन्यप्राण्याची शिकार होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशी मागणीही प्राणीप्रेमींकडून करण्यात येत आहे.

मावळात दोन दिवसांपूर्वी पाचाणे-पुसाणे गावांच्या हद्दीवर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. त्यांचे मुंडके आणि चारही पाय कापून नेले असल्याने हा शिकारीचाच प्रकार असल्याचे स्पष्ट झाले होते. वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील त्याला दुजोरा दिला असून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.

मध्यप्रदेशात वाघ- बिबट्या आदी वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. वाघ-बिबट्यांचा वावर असलेल्या जंगलांच्या सीमेवर शिकारीचे प्रकार घडतात. वाघ- बिबट्याचे तोंड, त्यांची नखे यांना मोठी किंमत मिळत असल्याने त्याची तस्करी केली जाते. अशाच तस्कारांनी स्थानिक व्यक्तीला हाताशी धरून मावळात बिबट्याची शिकार केली असावी, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

मावळात बिबट्याचे अस्तित्व फारच कमी आहे. त्यामुळे पुसाणे गावाच्या परिसरात बिबट्याच्या वावर असल्याची माहिती कोणत्या तरी स्थानिक व्यक्तीनेच शिकाऱ्यापर्यंत पोहचवली असण्याची शक्यता आहे. त्यानंतर शिकाऱ्यांनी आठ-दहा दिवस पाळत ठेवून बिबट्याचा बळी घेतला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शिकाऱ्यांना मदत करणारी स्थानिक व्यक्ती कोण आहे?, त्या काळात पाचाणे-पुसाणे परिसरात कोणत्या अनोळखी संशयित व्यक्तींचा वावर होता का?, याचा शोध वनखात्याचे अधिकारी घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.