Maval : पक्षासोबतच राहणार – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मला कोणतीही कल्पना नव्हती. मुंबईला अजितदादांनी बोलविले म्हणून मी आलो होतो. आपल्याला सरकार स्थापन करायचे असून ही पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सुप्रियाताईंनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर मला हा पक्षाचा निर्णय नसल्याचे कळले. आपण पक्षासोबतच राहणार असल्याचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी बंडखोरी करत आज (शनिवारी) भल्या पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून सरकार स्थापन केले. अजित पवार यांच्यासोबत मावळचे आमदार सुनील शेळके देखील होते. तसेच राष्ट्रवादीचे पाच ते सात आमदार देखील शपथविधीवेळी उपस्थित होते. मात्र, त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेला सुनील शेळके उपस्थित होते.

त्यानंतर मुंबईत पत्रकारांशी बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले, “मुंबईत बैठक असली की अजितदादा फोन करत असत. त्यामुळे मी बैठकीला येत होतो. काल देखील मला बोलावून घेतले. आपल्याला सरकार स्थापन करायचे आहे. ही पक्षाची भूमिका असल्याचे मला सांगण्यात आले. त्यानंतर सकाळी शपथविधीला झाला. परंतु, सुप्रियाताईंनी व्हॉट्सअॅप स्टेट्स ठेवल्यानंतर मला ती पक्षाची भूमिका नसल्याचे समजले.

मी पक्षात नवीन आहे. मला अजितदादांनी उमेदवारी दिली. पवारसाहेब माझ्या प्रचारासाठी आले होते. माझे खासदार सुप्रियाताई, आमदार रोहितदादा यांच्यासोबत बोलणे झाले आहे. मी पक्षांसोबतच राहणार असल्याचे शेळके यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like