Maval-Karla: एकविराआईच्या चरणी नतमस्तक होऊन मावळात शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ

एमपीसी न्यूज – समस्त महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या एकविरा आईचे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे दर्शन घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. कार्ला गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव येथील कार्यकर्त्यांच्या त्यांनी गाठीभेटी घेतल्या.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, तालुकाप्रमुख राजू खांडभोर, सचिन हुलावळे, अक्षय हुलावळे, सागर हुलावळे, विशाल हुलावळे, सतीश मोरे, यशवंत येवले, आशिष ठोंबरे, अंकुश देशमुख, अनिता गोते, नसीम शेख, स्नेहल शेवाळे, काजल शेख आदी उपस्थित होते. जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीजनिमित्त देहूगावात जाऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले.

  • कार्लागडावर बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शिवसेना-भाजपची महायुती झाली आहे. त्यामध्ये मावळ लोकसभेची जागा शिवसेना पक्षाला मिळाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या जागेची जबाबदारी दिली आहे. त्याची अधिकृत घोषणा येत्या काही काळात होणार आहे. मावळ लोकसभेचा प्रचार मी निवडून आल्यानंतर म्हणजे पाच वर्षांपूर्वीच सुरु झाला आहे. माझा प्रचार म्हणजे फक्त मत मागण्याचा नाही. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवून, विकासकामे करून ती कामे नागरिकांपर्यंत पोहोचवून आपला प्रचार सुरु आहे.

सतराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना आई एकविरा देवी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद घेणे महत्वाचे आहे. शिवसेना आणि भाजपचे सर्व सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकविराआईच्या चरणी नतमस्तक होऊन कामाला सुरुवात करत आहोत, असे बारणे म्हणाले.

  • महायुतीचा धर्म पाळणे ही प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याची जबाबदारी
    शिवसेना आणि भाजप पदाधिका-यांची नुकतीच बैठक झाली. त्या बैठकीसाठी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप अनुपस्थित होते. त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता बारणे म्हणाले, “देशात आणि राज्यात सक्षम सरकार आहे. देशाची धुरा पुन्हा एकदा सक्षम हातांमध्ये देण्याची जबाबदारी सर्व घटकपक्षांची आहे. त्यासाठी शिवसेना आणि भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते झोकून काम करतील, असा विश्वास आहे.”

राज्यात शिवसेना आणि भाजप पक्षाची महायुती झाली आहे. या महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. त्यामुळे महायुतीचा धर्म पाळण्याची जबाबदारी आता शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची आहे, असेही ते म्हणाले.

  • खासदार बारणे यांनी घेतल्या वेहेरगाव ग्रामस्थांच्या गाठीभेटी
    आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. कार्ला येथील एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर गडाच्या पायथ्याशी असलेल्या वेहेरगाव येथील ग्रामस्थ आणि पदाधिका-यांच्या भेटी घेतल्या. वेहेरगाव येथे वेहेरगाव ग्रामपंचायत, वेहेरगाव ग्रामस्थ, शिवसेना शाखा, भाजप शाखा, दहिवली शिवसेना शाखा आदींच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सचिन येवले, माजी सरपंच दत्ता पडवळ, शाखा प्रमुख कैलास पडवळ, विभाग प्रमुख सुरेश गायकवाड आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “मावळ मधील नागरिकांनी दोन वेळेस खासदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्यानंतर वेळोवेळी विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांशी संपर्क ठेवला. विरोधकांना या भागात एकही सक्षम उमेदवार मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी घरातला उमेदवार दिला आहे. पण, मतदार राजा सुजाण आहे. प्रत्येक नागरिक उमेदवाराला नाही तर त्याने केलेल्या कामाला मत देणार आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता विरोधकांना त्यांची जागा दाखवा, असेही खासदार बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.