Maval : ‘ किल्लेप्रेमी ‘ गुगलग्रुपची आज दशकपूर्ती

एमपीसी न्यूज – ‘अलाईव्ह’चा उपक्रम ‘किल्लेप्रेमी गुगलग्रुप’ची आज दशकपूर्ती साजरी होत आहे. गेले दहा वर्षे ‘किल्लेप्रेमी’ हा गुगलग्रुप
निसर्ग आणि किल्ले विषयी अविरतपणे प्रबोधन करत आहे. इमेल द्वारे विनामूल्य सेवा उपक्रम अनेक जल, पर्यावरण, किल्ले, जंगल, वृक्ष, पक्षी,
वन्यजीव, किल्ले प्रदर्शन, वृक्षारोपण, व्याख्यान, स्वच्छता मोहीम, किल्ल्यावरील निसर्ग आणि इतिहास विषयी माहिती, कट्टा व इतर कार्यक्रम
विषयी माहिती देण्यात येते.

हा ग्रुप उमेश वाघेला यांनी 6 नोव्हेंबर 2009 मध्ये सुरु केला. या ग्रुपवर पहिली पोस्ट 16 नोव्हेंबर 2009 ला दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांच्या
“किल्ल्यांपलीकडील किल्ले” प्रदर्शनाचे आमंत्रणाची होती. आजपर्यंत किल्लेप्रेमी गुगलग्रुप सभासद संख्या 888 झाली आहे. आजपर्यंत 692 पोस्ट
गृपवर शेयर करण्यात आल्या आहेत. ते आजही माहिती देण्याचे अविरत सुरु आहे. याद्वारे अलाईव्ह संस्थेच्या अनेक उपक्रमात अनेकांनी सहभाग घेतला आहे.

अलाईव्हच्या एक दिवस निसर्गासाठी, पक्ष्यांचे हक्काचे घर-नेस्टबॉक्स, सालिम अली पक्षी निरिक्षण दिन व अश्या अनेक उपक्रमांची माहिती किल्लेप्रेमीद्वारे दिल्यावर अनेकांनी सहभाग उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे. तसेच निसर्ग आणि किल्लेविषयी संवर्धन कार्य करणार्या अन्य संस्थांच्या किल्ले स्वच्छता मोहीम, दुर्गभ्रमण, दुर्गजागर व इतर कार्यक्रमाची देखील माहिती दिल्यावर अनेकांनी सहभाग घेतला आहे. तसेच गिर्यारोहकांनी विविध दुर्गम भागात मिळवलेले यश, विशेष मुलांनी किल्ल्यांवर पदभ्रमण करुन मिळवलेले यशकथा, किल्ल्यावरील दुर्मिळ वन्यजीवन, वनस्पति विषयी माहिती देखील देण्यात आली आहे. किल्ल्याच्या फोटोंचे, किल्ल्यांच्या प्रतिकृतीची प्रदर्शन, निसर्ग व दुर्गविषयक कट्टा, व्याख्यानमाला विषयी वेळोवेळी माहिती पुरवली जाते.

ही अभिनव कल्पना कशी सूचली या बाबत उमेश वाघेला म्हणाले,”मी व माझा मित्र चैतन्य राजर्षी सप्टेंबर 2009 मधे पुरंदर किल्ल्यावर रानफुलांच्या
अभ्यासाकरिता गेलो होतो. गाडी वरपर्यंत नेण्याएवजी मधेच सोडून पदभ्रमण करत वाटेतल्या सर्व रानफुलांच्या नोंदी करत गडावरील सर्वात उंच ठिकाण केदारेश्वर मंदिरला पोचलो. इथे एक कोलेजच्या तरुण-तरुणीचा आलेला ग्रुप गोंधळ घालत होता, मोठमोठ्याने ओरडणे, कचरा करणे सुरु होते. खरंतर सह्याद्रीतील सर्वच किल्ल्यांमधे दुर्मिळ रानफुलांसाठी पुरंदर वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र कॉलेजची ही मुले, पर्यटक तसेच अनेक गिर्यारोहक सुद्धा यापासून अजाणच होती.

निसर्गप्रेमी किल्ल्याकडे आपुलकीने बघतील किंवा गिर्यारोहक निसर्गाकडे कुतुहलाने बघतीलच असे सहसा दिसत नव्हते. या दोहोंचाही समन्वय साधून जनजागृती करायला पाहिजे, हे विचारचक्र माझ्या मनात सुरु झाले. लोकप्रबोधनची दीर्घकाळासाठी मोठ्या प्रमाणात अविरत करावी लागते. त्यासाठी कायमस्वरुपी माध्यम असावे म्हणून इमेलद्वारे प्रबोधन करण्याचे ठरविले. त्यासाठी गुगलग्रुप सुरु केला त्यास इतिहास अभ्यासक व दुर्गमहर्षी प्रमोद मांडे यांनी ग्रूपचे नाव ‘किल्लेप्रेमी’ सूचवले. सभासद जोडण्यासाठीसुद्धा त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. मांडे यांच्या किल्लेविषयी प्रदर्शनात या किल्लेपेमी ग्रुपचे सभासद होण्याचे आवाहन करण्यात आले त्यास अनेकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे .

प्रदर्शन, किल्ले स्वच्छता मोहिम, किल्ल्यांवर वृक्षारोपण अश्या विधायक कार्यांची माहिती तसेच किल्ल्यांविषयी माहिती देखील विनामूल्य देऊ लागलो. सभासदांची संख्या उत्तरोत्तर वाढू लागली. कोणतेही आर्थिक सहाय्य नसताना किंवा कोणत्याही जाहिराती शिवाय संपूर्णपणे लोकोपयोगी कार्य करत दशकपूर्ती ‘किल्लेप्रेमी’गुगलग्रुप मधे आजही अनेक लोक जोडली जात आहे.या उपक्रमात सहभागी होऊ इच्छूकांनी इमेल द्वारे [email protected] वर किंवा 9881101541 वर इमेल आयडी पाठवावा असे या ग्रुपच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.