Maval : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी खासदार बारणे यांना निवडून द्या – लक्ष्मण जगताप

एमपीसी न्यूज – देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील पाच वर्षात मोठी विकासकामे केली आहेत. त्यांच्या हाती देश सुरक्षित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. मोदी यांचे हात बळकट करण्याठी मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप- शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले. तसेच मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघापैकी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य बारणे यांना मिळाले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात सोमवारी (दि.15)बैठक घेतली. भाजपच्या नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्त्यांना प्रचाराबाबत मार्गदर्शन केले. नगरसेवक शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, सागर अंगोळकर, नगरसेविका माधवी राजापुरे, चंदा लोखंडे, उषा मुंडे, सीमा चौघुले, स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, स्वीकृत सदस्य महेश जगताप, माजी नगरसेवक राजू लोखंडे, गणेश बँकेचे अध्यक्ष सूर्यकांत गोफणे, रावसाहेब चौघुले, भाजपचे उपाध्यक्ष श्रीनिवास बढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लक्ष्मण जगताप म्हणाले, “खासदार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात संसदेत चांगले काम केले आहे. आपल्या कामाची छाप पाडली आहे. सलग पाच वर्ष संसदरत्न पुरस्कार बारणे यांना मिळाला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडले आहेत. एका चांगला खासदार म्हणून बारणे यांना पुन्हा संसदेत पाठवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी झटून कामाला लागावे”

जगताप यांनी बुथ, शक्तीकेंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन केले. एक हजार मतदारांची जबाबदारी दहा लोकांकडे देण्यात आली आहे. त्यांना दहा सहाय्यक देण्यात आले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक शक्ती केंद्र प्रमुख नेमला आहे. पाच हजार मतदारासांठी एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती केली आहे. प्रत्येक एक हजार मतदारामागे एक बूथप्रमुख आणि त्याला सहाय्यक अशी दहा लोकांची टीम आहे. एका सहाय्यकाकडे 100 मतांची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक मतदारापर्यंत पोहचायचे आहे. धनुष्यबाण हे चिन्ह संपूर्ण मतदारांपर्यंत पोहचवून जास्तीत-जास्त मतदान महायुतीचे उमेदवार बारणे यांना देण्याचे आवाहनही जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र राजापुरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.