Maval : पाचाणे-पुसाणे गावच्या हद्दीवर बिबट्याची शिकार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पाचाणे-पुसाणे गावच्या हद्दीवर बिबट्याचा मृतदेह आढळला. बिबट्याचे चारही पाय आणि डोके कापून नेले असून नखांसाठी बिबट्याची शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. 19) पाचाणे आणि पुसाणे गावातील काही शेतकरी जनावरे चारण्यासाठी शेतात गेले. दुपारच्या वेळी शेतक-यांना दोन्ही गावच्या हद्दीवर उग्र वास आला. त्यामुळे शेतक-यांनी वासाच्या दिशेने जाऊन पाहिले असता बिबट्याचा मृतदेह आढळला. बिबट्याचे चारही पाय आणि डोक्याचा काही भाग कापून नेला आहे. त्यामुळे या बिबट्याची दात आणि नखांसाठी शिकार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच मावळचे वनपरिक्षेत्र अधिकारी सोमनाथ ताकवले आणि वन्यजीव विभागाचे अधिकारी मारणे घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी जंगलातील झाडे, ओंडके आणि टायरच्या साहाय्याने बिबट्याला जाळून टाकले. याची माहिती न पसरविण्याचा उद्देशाने वनविभागाच्या अधिका-यांनी हा प्रकार केल्याचे स्थानिक ग्रामस्थ म्हणत आहेत.

मावळ परिसरात बिबट्या आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना होती. ग्रामविकास मुळशी तालुका आणि फ्रेंड्स ऑफ नेचर या दोन संस्थांच्या वतीने संबंधित गावातील नागरिकांना बिबट्याबाबत माहिती देण्यात आली होती. तसेच बिबट्याच्या संरक्षणाबाबत देखील सांगण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी बिबट्याच्या संरक्षणासाठी काम करण्याचे ठरवले होते. तरीही आढळलेल्या बिबट्याची शिकार झाली आहे. मावळ परिसरात शिकारी जोरात सुरु आहेत. रानडुकरे, मोर, बिबट्या आणि अन्य वन्य प्राण्यांच्या शिकारी केल्या जात आहेत. त्यावर वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.

उप वनसंरक्षक श्रीलक्ष्मी अण्णाभाथूला म्हणाल्या, “बिबट्याचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आम्ही शवविच्छेदन अहवालाच्या प्रतीक्षेत आहोत. मात्र हा नैसर्गिक मृत्यू वाटत नाही. त्यादृष्टीने आम्ही तपास करीत आहोत.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like