BNR-HDR-TOP-Mobile

Maval : सांगवडे भागात आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील सांगवडे, जांबे भागात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. हा बिबट्या कधी शेळ्या राखण्यासाठी गेलेल्या महिलेच्या तर कधी शाळकरी मुलांच्या नजरेस पडत आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने सांगवडे गावातून कुत्रा पळवून नेला. यामुळे गावक-यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सांगवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप सपकाळ यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “मागील आठ दिवसांपासून सांगवडे भागात बिबट्याचा वावर आढळून येत आहे. हा बिबट्या शेळ्या चारण्यासाठी जाणा-या महिलांच्या नजरेस पडत आहे. तर कधी शाळकरी मुलांच्या नजरेस पडत आहे. यामुळे गावक-यांसह शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याचा विषय निघताच मुलांना भीतीची धडकी भरत आहे.
दोन दिवसांपूर्वी सांगवडे गावातून एक कुत्रा बिबट्याने नेला आणि फस्त केला. बुधवारी (दि. 10) सांगवडे गावाजवळ असलेल्या पॉलिहाऊस जवळ गावक-यांना बिबट्या दिसला. वनविभागाला याबाबात माहिती देण्यात आली. वनविभागाने गावात भेट देऊन बिबट्या दिसलेल्या ठिकाणांची पाहणी केली. सांगवडे भागात दिसणारा बिबट्या मादी बिबट्या असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले आहे.
वडगाव वनपरिमंडळ विभागाचे सोमनाथ टेकवले म्हणाले, “मागील काही दिवसांपूर्वी सांगवडे गावातील दोनजण कार्यालयात आले होते. त्यांनी गावात बिबट्या आढळल्याचे सांगितले. त्यानुसार गावात भेट देऊन ग्रामसभा घेऊन जनजागृती करण्यात आली आहे. गावातील रस्त्यांवरील पथदिवे सुरु ठेवावेत, वृद्धांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडू नये, अशा गावक-यांना सूचना करण्यात आल्या आहेत. एका ठिकाणी गावक-यांनी सांगितल्याप्रमाणे ठशांचे नमुने घेऊन निरीक्षणासाठी पाठवले आहेत. यापुढे बिबट्या आढळून आल्यास वरिष्ठ कार्यालयाला माहिती देऊन कारवाई करण्यात येईल, असेही टेकवले यांनी सांगितले.
HB_POST_END_FTR-A2

HB_POST_END_FTR-A3