Maval: लोकसभेचे बिगुल वाजले; मावळातून श्रीरंग बारणे-पार्थ पवार यांच्यात लढत?

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीचे आज बिगुल वाजले असून 29 एप्रिलला मावळ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या मावळ मतदारसंघातून शिवसेना-भाजप युतीचे खासदार श्रीरंग बारणे आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे पार्थ पवार यांच्यात लढत होण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेतर्फे बारणे यांची उमेदवारी निश्चित आहे. तर, राष्ट्रवादीने पार्थ यांची उमेदवारी जवळपास नक्की केली. त्यामुळे मावळमध्ये युतीचे बारणे आणि आघाडीचे पवार यांच्यात दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

मावळ लोकसभा मतदारसंघ सलग दुस-या वेळी शिवसेनेच्या ताब्यात आहे. तिस-यावेळी भगवा फडकाविण्यासाठी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे सज्ज झाले आहेत. तर, शिवसेनेचा पराभव करुन मतदारसंघावर कब्जा करण्यासाठी राष्ट्रवादीने देखील तयारी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची चिन्हे आहेत.

  • शिवसेना-भाजपची युती झाली आहे. भाजपने मावळ मतदारसंघावर दावा केला होता. परंतु, शिवसेनेने मतदारसंघ सोडण्यास ठाम नकार दिला. त्यामुळे शिवसेना-भाजप युतीची उमेदवारी श्रीरंग बारणे यांना निश्चित आहे. भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील युतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले आहे.

मावळातून राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार असण्याची शक्यता आहे. घाटाखाली रायगड परिसरात प्राबल्य असणा-या शेतकरी कामगार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार जयंत पाटील यांनी मावळातून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी देखील पार्थ यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केली होती.

  • पक्षाने पार्थ पवार यांचीच उमेदवारी निश्चित केल्याची माहिती आहे. त्यामुळे मावळमध्ये युतीचे बारणे आणि आघाडीचे पवार यांच्यात दुरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत.

मावळ लोकसभेतील आमदार!
# गौतम चाबुकस्वार, पिंपरी (शिवसेना)
# लक्ष्मण जगताप, चिंचवड (भाजप)
# बाळा भेगडे, मावळ (भाजप)
# मनोहर भोईर, उरण (शिवसेना)
# प्रशांत ठाकूर, पनवेल (भाजप)
# सुरेश लाड, कर्जत खालापूर (राष्ट्रवादी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.