Maval : महायुती केवळ कुटुंबाचा नाही तर संपूर्ण देशाचा विचार करते – रामशेठ ठाकूर

एमपीसी न्यूज – शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना या पक्षांची महायुती झाली आहे. या महायुतीने उमेदवार उभा करताना केवळ एखाद्या कुटुंबाचा नाही तर संपूर्ण देशाच्या विकासाचा विचार केला आहे, असे मत माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केले.

पनवेल मधील कामोठे येथे झालेल्या बैठकीत माजी खासदार रामशेठ ठाकूर बोलत होते. यावेळी शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौटमल, परेश ठाकूर, दत्ता दळवी, विक्रांत पाटील, शिरीष घरत, बाबनदादा पाटील, किशोरी पेडणीकर, रत्नाकर घरत, प्रभाकर गोसावी, डॉ. अरुण कुमार भगत, अनिल चव्हाण, रामदास शेवाळे, कल्पना राऊत, प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे आदी उपस्थित होते.

माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, “आपण आपल्या कुटुंबाचा विचार करत नाही. तर संपूर्ण देशाचा विचार करतो. आपली बाजू सत्याची आहे. सत्य आपल्यासोबत असल्यामुळे आपल्याला घाबरण्याचे काही कारण नाही. देशाच्या संसदेत पोहोचल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये बारणेसंसदेत आपला ठसा उमटवला आहे, ही खूप मोठी बाब आहे. आपला उमेदवार सक्षम असला तरी गाफील राहून चालणार नाही. सर्व मतदारांपर्यंत पोहोचून आपलं काम सर्वांपर्यंत पोहोचविण्याची आज गरज आहे. सर्व कार्यकर्त्यांनी त्यासाठी कामाला लागलं पाहिजे, असेही ते म्हणाले.

बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला ‘मैं भी चौकीदार’ या कार्यक्रमात सर्व उपस्थितांनी भाग घेतला. यावेळी ‘बार बार – मोदी सरकार’, ‘आप्पा बारणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणा सर्व उपस्थितांनी दिल्या. तसेच नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी, त्यांचे हात बळकट करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनाच विजयी करण्याचा संकल्प करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.