Maval: तालुक्यातील सर्व कंपन्या, दुकाने, बांधकामे सुरू करण्यास परवानगी

एमपीसी न्यूज – शासन निर्णयानुसार मावळ तालुका ऑरेंज झोनमध्ये असल्याने तालुक्यातील सर्व कंपन्या, दुकाने, बांधकामे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असल्याची माहिती आमदार सुनील शेळके व तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मावळ तालुक्यात गेल्या २१ दिवसात एकही रुग्ण आढळला नसल्याने मावळ तालुक्याचा ऑरेंज झोनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच घटना व्यवस्थापक तथा प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे तालुक्यातील सर्व औद्योगिक उपक्रम, बांधकामे, तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह सर्वप्रकारची दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

कंपन्या, बांधकामे सुरू करताना पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील कामगार आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच काम सुरू राहणार आहे. फक्त तालुक्यातील कामगारांना बोलावून व सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून कंपन्या व बांधकामे सुरू करावीत, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

जीवनावश्यक वस्तूंसह सर्व प्रकारची दुकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच यावेळेत सुरू ठेवता येणार आहेत. घरपोच दूध वितरण हे

सकाळी सहा ते नऊ या वेळेत चालू राहणार आहे. तसेच सायंकाळी सात ते सकाळी सात यावेळेत नागरिकांना वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त बाहेर फिरण्यास निर्बंध घालण्यात आला आहे.

शहरातील दुकानांबाबत नियोजन दरम्यान, ग्रामीण भागातील सर्व दुकानांना परवानगी असली तरी शासन नियमाप्रमाणे शहरी भागात एकल दुकाने सुरू करता येतील. परंतु एकसलग ५ पेक्षा जास्त असलेली दुकाने सुरू करता येणार नाहीत

याबाबत दोन दिवसात नियोजन करून संबंधित शहरामधील जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसह इतर दुकाने सुरू करण्यासाठी निर्णय घेण्यात येणार असल्याचे आमदार शेळके व तहसीलदार बर्गे यांनी सांगितले.

हे राहणार बंद!

हॉटेल, उपाहारगृह, चहाची दुकाने, सलून, सर्व शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण संस्था, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा, सिनेमागृहे हे बंद राहणार असून सामाजिक,   राजकीय, धार्मिक आदी कार्यक्रमांवरील बंदी कायम राहणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.