Maval : ‘त्या’ दूध आणि भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करा – किशोर भेगडे

एमपीसी न्यूज – पवन मावळ, आंदर मावळ, नाणे मावळ आणि मावळातील अन्य भागातून अनेक गवळी (दुधवाले) पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात दूध घालण्यासाठी जातात. तसेच काही भाजी विक्रेते मावळ भागात भाजी विकण्यासाठी येतात. मावळ भागात अद्याप कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसून या गवळी आणि भाजी विक्रेत्यांच्या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे यांची कोरोना चाचणी करावी, अशी मागणी उद्योजक व तळेगाव नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक किशोर भेगडे यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांचेकडे केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. शहरातील अनेक भागांत हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच तिथे संचारबंदी आणखी कठोर करण्यात आली आहे. संचारबंदीच्या परिस्थितीत जीवनावश्यक वस्तू आणि सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मावळ भागातून अनेक दुधवाले पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात दूध घालण्यासाठी नियमित जातात. काही जणांचे दहा घरी तर काही जणांचे 15-20 घरात रतीब ठरलेले असतात. हे दुधवाले घरोघरी जाऊन दूध वाटप करत असतात.

त्याचप्रमाणे पुणे आणि पिंपरी चिंचवड भाजी मंडईतून अनेक भाजी विक्रेते मावळ भागातील देहूरोड, कॅन्टोन्मेंट, तळेगाव, लोणावळा, कामशेत, वडगाव आणि अन्य भागात जात असतात. त्यांचाही अनेक लोकांशी संपर्क येतो. मावळ परिसरात एकही कोरोना रुग्ण नसल्याने आणखी खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे दुधवाले आणि भाजी विक्रेत्यांची कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. मावळ भागात कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी दुधवाले आणि भाजी विक्रेते यांचे घरोघरी फिरणे धोक्याचे ठरू शकते. जीवनावश्यक वस्तू आणि सेवा असल्याने यांचा पुरवठा थांबवणे शक्य नाही. त्यामुळे यांची नियमित तपासणी आणि कोरोनाची चाचणी करावी, असेही भेगडे म्हणाले.

दूध विक्रेत्यांनी दूधाचे वितरण करताना आवश्यक ती काळजी घ्यावी. ग्राहकांपासून सोशल डिस्टन्सिंग पाळावा, असे आवाहनही भेगडे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.