Maval: वहानगाव येथे ‘बफर झोन’मध्ये आमदारांनी घेतली ग्रामस्थांची बैठक, गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

Maval: MLA held a meeting of villagers at Wahangaon in 'Buffer zone', BJP's demand to file a case

एमपीसी न्यूज –  वहानगाव या बफरझोनमधील मंदिरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांची बैठक घेऊन सुरक्षित अंतराच्या नियमाची पायमल्ली केल्याप्रकरणी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यावर साथरोग अधिनियमान्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी लोणावळा शहर भाजपाचे अध्यक्ष रामविलास खंडेलवाल व नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजयुमोचे प्रदेश सचिव जितेंद्र बोत्रे, माजी नगरसेवक विजय सिनकर, बाळासाहेब जाधव हे उपस्थित होते.

जाधव म्हणाल्या की, 23 मे रोजी नागाथली या गावात कोरोना रुग्ण सापडल्याने नागाथली हे गाव कंटेनमेंट झोन व शेजारील वहानगाव हे बफर झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. असे असताना वहानगावात आमदार सुनील शेळके यांनी एका मंदिरात ग्रामस्तांची बैठक आयोजित केली होती.

मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच मावळचे तहसीलदार व गटविकास अधिकारी देखील या बैठकीला हजर होते. मंदिरात सुरक्षित अंतराचा नियम न पाळता मांडीला मांडी लावून सर्वजण बसले होते. अनेकांच्या तोंडाला मास्क देखील नव्हते. आमदारांच्या या बैठकीने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविण्यास मदत होणार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, ही आमची मागणी असल्याचे नगराध्यक्षा जाधव यांनी सांगितले.

लोणावळ्यात सुरक्षित अंतराचे नियम पाळून आंदोलन करणार्‍या भाजपा कार्यकर्त्यांवर राजकीय दबावापोटी गुन्हे दाखल करण्यात आले. आता तर  आमदारांनी नियम धाब्यावर बसवत मंदिरात बैठक घेतली आहे, मग त्यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. सत्ताधार्‍यांना एक न्याय व विरोधकांना दुसरा न्याय, हा भेदभाव शासनाने करू नये अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपाने दिला आहे.

लोकहितासाठी माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असल्यास खुशाल करा – आमदार सुनील शेळके

वहानगावातील गायरानाची जागा मागील सरकारच्या काळात येथील राजकीय मंडळींनी परस्पर एका प्रोजेक्टकरिता दिली होती. ही माहिती ग्रामस्थांना समजल्यानंतर ते संतप्त झाले व तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याच्या तयारीत होते. मी व तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांनी गावात जाऊन ग्रामस्थांची समजूत काढून आंदोलन करण्यापासून परावृत्त केले. मी कोणतीही राजकीय बैठकीला गेलो नव्हतो. लोकहितासाठी माझ्यावर गुन्हा दाखल करायचा असल्यास खुशाल करावा. मावळ तालुक्याला कोरोनामुक्त करणे, हे माझे प्रथम ध्येय आहे. त्यानंतर समोरोसमोर बसून राजकारण करू , असा शेराही आमदार शेळके यांनी मारला.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.