Maval : पाणी, जुने पूल, रस्त्यांबाबत सुनील शेळके यांनी विधानसभेत आवाज उठविला

मावळवासियांना मुबलक पाणी द्या, ब्रिटिशकालीन पुलांचे ऑडिट करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – माझा मावळ तालुका दुष्काळी नाही. आम्ही बाहेरच्या 40 लाख जनतेला पाणी देतो. पण आम्हाला पाणी नाही, अशी परिस्थिती आहे. मावळातील सरकारच्या योजनांचा बोजवारा उडाला आहे. सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी. मतदारसंघातील ब्रिटिशकालीन पूल धोकादायक झाले आहेत. ब्रिटिशकालीन पुलांचे ऑडिट करावे. नवीन पर्यायी पूल उभारण्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 तळेगाव-चाकण शिक्रापुर रस्त्याच्या बाह्यमार्ग रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलावीत अशी मागणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी विधानसभेत केली.

नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात आमदार शेळके यांनी आपल्या मावळ मतदार संघातील अनेक प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले. पाणी समस्या, पुलांची, रस्त्यांची दुरुस्ती या प्रश्नांवर त्यांनी सभागृहात आवाज उठवत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली.

_PDL_ART_BTF

सभागृहात बोलताना आमदार शेळके म्हणाले, “मावळ मतदारसंघात इंद्रायणी, पवना नद्या वाहत आहेत. या नद्यांवर अनेक ब्रिटीशकालीन पूल आहेत. रस्ते पुलाशी संलग्न असून मुख्ये रस्ते असल्याने मोठ्या प्रमाणात रहदारी होते. ब्रिटिशकालीन पुल जुने झाले आहे. त्यांची अवस्था बिकट झाली आहे. पुल अरुंद आहे. पुलाची दुरावस्था झाली आहे. नागरिकांना पर्यायी मार्ग नाहीत. त्यामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन दिवसांपुर्वी आंबी गावाजवळील ब्रिटिशकालीन पूल कोसळला. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. पण, भविष्यात अशी घटना घडू नये. यासाठी मावळ मधील आणि पुणे जिल्ह्यातील ब्रिटिशकालीन पुलांचे ऑडिट करावे. नवीन पर्यायी पूल उभारण्यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी”

मावळमधून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 तळेगाव-चाकण शिक्रापुर रस्त्याच्या बाह्यमार्ग रुंदीकरणाचे काम मागील दहा वर्षांपासून प्रलंबित आहे. तळेगाव-चाकणला एमआयडीसी आहे. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. रस्ता अरुंद असल्याने महामार्ग असून देखील बाह्यवळण व पादचारी पूल नसल्याने दरवर्षी अपघातात अनेकांचे बळी जातात. नागरिकांचे बळी जाऊ नयेत, वाहतूक कोंडी होऊ नये याकरिता देखील राज्य सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा.

मावळ निसर्ग संपन्न असून मावळात राज्य सरकारची पाच धरणे आहेत. टाटा कंपनीच्या मालकीची तीन धरणे आहेत. अनेक गाव तलाव, तळे आहेत. तरीदेखील मतदारसंघातील माय भगिनींना डोक्यावर हंडा घेऊन पाणी भरावे लागते. सायकलला कॅन्ड धरुन पाणी वाहवे लागते. डोळ्यासमोर पाणी असून देखील सरकारच्या योजनेतून घरामध्ये पाणी येत नाही हे दुर्दैव आहे. या भागातील राज्याच्या अनेक जल योजना सुरू आहेत. मात्र या योजनांचा बोजवारा उडाला आहे. आम्ही दुष्काळी नाही. मावळातून बाहेरच्या नागरिकांना पाणी दिले जाते. परंतु, स्थानिकांनी पाणी मिळत नाही. त्यामुळे सरकारने याची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणीही आमदार शेळके यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.