Maval: कंपन्यांनी लोकांच्या जीवाशी खेळ केला तर खपवून घेणार नाही – आमदार सुनील शेळके

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतरही मावळातील अनेक कंपन्यांनी काम चालू ठेवून कामगारांच्या जीवाशी खेळ चालवला आहे, असा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. या कंपन्यांनी आज (शनिवार) संध्याकाळी सहापर्यंत पूर्ण कामकाज थांबवून कामगारांना घरी पाठवले नाही तर कंपनी व्यवस्थापनाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, असे आदेश त्यांनी तहसीलदारांना दिले आहेत.

कोरोना हे देशावरील संकट असून त्याचा मुकाबला करणे सर्वांचेच राष्ट्रीय कर्तव्य आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्र्यांनी 31 मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने, व्यवसाय, उद्योग बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत, मात्र मावळातील अनेक कंपन्यांनी शासनाचा आदेश धाब्यावर बसवून उत्पादन सुरू ठेवले आहे. हा सार्वजनिक आरोग्याशी चालविलेला खेळ असून तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.

_MPC_DIR_MPU_II

कामगारांच्या मनात कोरोनाविषयी भीती आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून काळजी घेण्याची त्यांची इच्छा आहे, मात्र कंपन्या कामकाज चालू ठेवून सर्वांचा जीव धोक्यात घालत आहेत. कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी काही दिवस सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी मावळातील कंपन्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.

संध्याकाळी सहानंतर आपण स्वतः तसेच प्रमुख शासकीय अधिकारी औद्योगिक वसाहतींमध्ये फेरफटका मारून समक्ष पाहणी करणार आहोत. त्यावेळी कोणतीही कंपनी सुरू असल्याचे आढळून आले तर गय केली जाणार नाही, असा इशारा आमदार शेळके यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.