Maval: ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत मावळातील 20 हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप 

मावळचे आमदार सुनील शेळके यांचा विधायक उपक्रम, तालुक्यातील वाडी-वस्तीवरसुद्धा घरपोच मिळणार जीवनावश्यक वस्तू.

एमपीसी न्यूज – कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला असून हजारो कुटुंबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे, मात्र सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून मावळातील 20 हजार गरजू कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल अशा जीवनावश्यक वस्तू मोफत देण्याचा उपक्रम आमदार सुनील शेळके यांनी हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात 14 हजार कुटुंबांना, तर दुसऱ्या टप्प्यात सहा हजार कुटुंबांना धान्यवाटप करण्यात येणार आहे. 

तालुका प्रशासन आणि आमदार सुनील शेळके मित्र परिवार यांच्या वतीने तहसील कार्यालय येथे आज (सोमवारी) सकाळी या उपक्रमाची औपचारिक सुरूवात करण्यात आली. यावेळी मावळचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार चाटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर, वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले तसेच अन्य पदाधिकारी, सर्व मंडलाधिकारी, उद्योजक, सामाजिक संस्था, युवा मंचचे सभासद उपस्थित होते.​

 आमदार शेळके म्हणाले की, कोरोना विषाणुविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी संयमाने लढा देत आहेत. कोरोनामुळे अडचणीत असलेल्या कुटुंबांना आम्ही मदत नव्हे तर कर्तव्य भावनेतून या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. या मदतीचे वाटप करताना प्रशासनाने दिलेल्या ‘सोशल डिस्टन्सिंगबाबत सूचनांचे पालन करण्यात येणार आहे.

गरजू कुटुंबांना एक महिना पुरेल इतका किराणासह अत्यावश्यक ११ वस्तूंचा संच तयार केला आहे. ग्रामीण भागातील आंदर मावळ, नाणे मावळ, पवन मावळ येथील गरजू कुटुंबांसह 19 आदिवासी गावे, डोंगर पठारावर असणारे पाडे, वाड्या वस्त्यांवर जावून घरपोच धान्यवाटप केले जाणार आहे. विशेष म्हणजे, याकामी शासकीय अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांचीही मदत घेतली जाईल, असेही आमदार शेळके म्हणाले.

लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागत आहे. अशा संकटात समाजाप्रती आपण आपले कर्तव्य केले पाहिजे. प्रत्येकाने आपली नैतिक जबाबदारी ओळखून समाजासाठी कार्य करणे आवश्यक आहे. या लढाईत आपणा सर्वांचेच योगदान महत्वाचे आहे. तालुक्यातील कुठलाही व्यक्ती उपाशी राहणार नाही याची काळजी आम्ही घेत आहोत, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.