Maval : जागेच्या वादातून किराणा व्यापाऱ्याचा कोयत्याने वार करून खून

Maval: Murder of a grocery trader with a scythe over a land dispute

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून दोघांनी मिळून किराणा मालाच्या व्यापाऱ्याचा कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना आज (बुधवारी, दि. 22) सायंकाळी पावणेसात वाजताच्या सुमारास कान्हे फाटा, मावळ येथे घडली.
गेवरचंद कान्हाराम परमार (वय 56, रा. कान्हे फाटा, मावळ) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत परमार हे किराणा मालाचे व्यापारी होते. त्यांनी 25 वर्षांपूर्वी अशोक सातकर यांच्याकडून कान्हे फाटा येथे घर बांधण्यासाठी जागा विकत घेतली होती. त्या जागेत परमार कुटुंब घर बांधून राहत आहे.
दरम्यान अशोक सातकर यांचा मृत्यू झाला. दोन महिन्यांपूर्वी अशोक सातकर यांचा मुलगा सागर सातकर हा परमार यांच्याकडे आला. ‘आमची जागा तुझ्याकडे जास्त निघत आहे. त्या जागेचे पैसे दे’ अशी सागर याने परमार यांच्याकडे मागणी केली. त्यावर परमार यांनी ‘जागेची मोजणी करून बघू आणि त्यानंतर पैसे किती द्यायचे ते ठरवू’ असे सांगितले.
दोन-तीन दिवसांपूर्वी सागर पुन्हा परमार यांच्याकडे आला आणि पुन्हा पैशांची मागणी केली. त्यानंतर जागेची मोजणी करण्यात आली. त्यावेळी सागर आणि परमार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
बुधवारी सायंकाळी सागर आणि त्याचा एक साथीदार परमार यांच्याकडे आला. सागर याच्या हातात कोयता होता, तर त्याच्या साथीदाराकडे चाकूसारखे हऱ्यार होते. दोघांनी परमार यांच्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात परमार गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर त्यांना तात्काळ नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा तपासणीपूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. वडगाव मावळ पोलीस तपास करीत आहेत.
बुधवारी सकाळी फार्म हाऊसवर मॅनेजर म्हणून काम करत असलेल्या एकावर गोळीवर करण्यात आला. सकाळच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे मावळ परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर सायंकाळी एका व्यापाऱ्याचा खून झाल्याने मावळ परिसर हादरून गेला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.