Maval Murder Update: यश असवलेचा खून टाकवेतील राजकीय वर्चस्वाच्या वादातून, उपसरपंच गजाआड

Maval Murder Update: Yash Aswale killed in a dispute over political supremacy in Takve village, Deputy Sarpanch Arrested

एमपीसी न्यूज – टाकवे बुद्रुक येथील यश असवले या तरुणाचा खून राजकीय वर्चस्वाच्या कारणातून झाल्याचे तपासात उघड झाले असून या खून प्रकरणाचा कट रचल्याच्या आरोपावरून टाकवेच्या विद्यमान उपसरपंचास वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, वडगाव मावळ न्यायालयाने त्यास चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. 

प्रकरणातील  मुख्य सूत्रधार विद्यमान उपसरपंचाला पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:चे राजकीय अस्तित्व संपण्याच्या भीतीने टाकवे बुद्रुक येथील विद्यमान उपसरपंचानेच खुनाचा कट रचून पुतण्या व त्याच्या मित्रांकडून यश रोहीदास असवले (वय २२) याचा खून केला आहे, अशी माहिती माहिती पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणी खुनाचा मुख्य सुत्रधार टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचा विद्यमान उपसरपंच रोहीदास राघू असवले (वय ४२ रा.टाकवे) याला काल (रविवारी) अटक करण्यात आली. वडगाव न्यायालयात हजर केले असता 29 मेपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी ऋतिक बाळू असवले (वय-20), अजय बबन जाधव (वय 24 दोघेही रा. टाकवे), अतिष राजू लंके (वय 21,रा वननगर,तळेगाव दाभाडे) विकास उर्फ बापू विष्णू रिठे (वय 23 रा. गुरूदत्त काॅलनी, वराळे रोड, तळेगाव), ऋतिक कांताराम चव्हाण (वय 19, रा. म्हाळसकर वाडा, वडगाव मावळ), अश्विन कैलास चोरघे (वय 22, रा. घोणशेत मावळ), निखिल भाऊ काजळे (वय 20, रा वडगाव मावळ) यांना अटक केली होती. तर रविवारी (दि 24) रात्री उपसरपंच रोहिदास राघू असवले याला अटक केली आहे.

ऋतिक बाळू असवले व त्याच्या मित्रांकडून शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास कोयत्याचे वार करून त्याचा खून करण्यात आला. या नंतर पोलिसांनी अवघ्या पाच तासात सात आरोपींना अटक केली. लोणावळा विभागाचे सहायक पोलिस अधिक्षक नवनीत काॅवत व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर  यांनी सोमवारी या घटनेतील अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता, या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार उपसरपंच असल्याची माहिती उघड झाली. या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींची संख्या आठ झाली आहे. त्यांच्या कडून मोबाईल, तीन मोटारसायकल व हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

टाकवे गावातील ‘जीवघेणे’ राजकारण!

यश असवले याचा खून टाकवे गावातील राजकीय वर्चस्वाच्या वादातून उपसरपंच रोहिदास असवले यांनी कट रचून केला असल्याचे उघड झाले आहे, अशी माहिती वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिली. टाकवे ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत मृत यश याची आई रेखा असवले या काही महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत उपसरपंच रोहिदास राघू असवले यांनी निवडणुकीत उभ्या केलेल्या उमेदवाराच्या विरूध्द मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्या होत्या. या विजयात यश याचा मोठा वाटा होता.

काही दिवसात गावच्या सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. सरपंचपदासाठी रेखा असवले उभ्या राहणार होत्या. त्या सरपंच झाल्या तर आपले महत्त्व कमी होईल. यशमुळे आपले राजकीय अस्तित्व संपत चालल्याची भावना निर्माण झाल्याने उपसरपंच रोहिदास असवले याने यशचा काटा काढण्याच्या हेतूने कट रचून पुतण्या व त्याच्या मित्रांच्या साथीने यशचा खून घडवून आणला असल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती निंबाळकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like