_MPC_DIR_MPU_III

Maval: मावळच्या महायुतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची होणार सभा

मुख्यमंत्री फडणवीस, शिवेसनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याही धडाडणार तोफा

एमपीसी न्यूज – मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीच्या उमेदवारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. मावळ आणि रायगड या दोन्ही मतदारसंघाच्या मध्यभागी ही सभा घेण्याचे नियोजित आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याही तोफा धडाडणार आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीतर्फे खासदार श्रीरंग बारणे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप-स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (कवाडे गट)गवई गट, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांचे आव्हान आहे. पार्थ हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. राज्याचे दिग्गज राजकारणी अशी ओळख असलेल्या पवार घराण्यातील उमेदवार असल्याने या मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

_MPC_DIR_MPU_II

अजितदादांनी मुलाच्या प्रचाराची धुरा हाती घेतली आहे. सर्वपक्षीय आजी-माजी नगरसेवकांना फोन करुन मुलाचे काम करण्याची विनंती पवार करत आहेत. त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य प्रचारात सक्रिय झाले आहेत. यामुळे महायुतीच्या उमेदवाराला कोणतीही अडचण येऊ नये यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेतली जाणार आहे.

रायगडमध्ये महायुतीकडून केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते तर आघाडीतर्फे माजी मंत्री सुनील तटकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तटकरे यांनी गीते यांना तगडे आव्हान दिले आहे. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत सुद्धा तटकरे यांनी चांगली लढत दिली होती. केवळ अडीच हजार मतांनी तटकरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे युतीचे उमेदवार गीते यांच्यासाठी थेट मोदी यांची सभा घेतली जाणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याही मावळ मतदारसंघात प्रत्येकी दोन सभा घेण्याचे नियोजन आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले, ”मावळ आणि रायगड येथील उमेदवारासाठी पनवेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे. शिवसेना नेते, उद्योगमंत्री, कर्जत-खालापूर-रायगडचे समन्वय सुभाष देसाई त्याचे नियोजन करत आहेत. त्याचबरोबर शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासही जाहीर सभा होणार आहेत”.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.