Maval: सलग सहाव्या दिवशीही सापडला नवीन कोरोना रुग्ण, घोणशेतचा रुग्ण निघाला पॉझिटीव्ह! मावळात एकूण 10 सक्रिय रुग्ण

Maval: New Corona patient found on the sixth consecutive day, Ghonshet patient tested positive! A total of active patients in Maval rises up to 10

एमपीसी न्यूज – मावळात सलग सहाव्या दिवशी नवीन कोरोना रुग्ण आढळला आहेत. मुंबईतील गोवंडी येथून 17 मेला घोणशेत येथे आलेल्या 40 वर्षीय व्यक्तीचाही कोरोना चाचणी अहवाल आज (रविवारी) पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता तालुक्यातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या दहा झाली आहे. गेल्या 17 दिवसांमध्ये मावळात शहरी भागात 3 व ग्रामीण भागात 9 अशा एकूण 12 जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मावळातील कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत चालल्याने तालुक्यात चिंतेचे वातावरण आहे. 

आज (रविवार) घोणशेत येथील 40 वर्षीय व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. संबंधित व्यक्ती 17  तारखेला गोवंडी (मुंबई)  येथून घोणशेत येथे आली होती. त्यामुळे त्या व्यक्तीचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला होता, अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

आता घोणशेत येथील रुग्णाच्या कुटुंबातील एकूण 9 जवळच्या संपर्कातील सदस्यांचे स्वॅब नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले आहे. कंटेन्मेट झोन म्हणून घोणशेत या गावाचा सामावेश करण्यात आला आहे तर बफर झोनमध्ये टाकवे बुद्रुक आणि कचरेवाडी या गावांचा समावेश आहे, असे बर्गे यांनी सांगितले.

तळेगावात 7 मे रोजी तालुक्यातील पहिला कोरोना रूग्ण सापडला. त्यापाठोपाठ 11 मे रोजी माळवाडी येथे दुसरा रुग्ण आढळला. त्यानंतर 19 मे अहिरवडे, 20 मे नागाथली, 21 मे वेहेरगाव व चांदखेड या दोन ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळला. 22 मेला तळेगावमध्ये एकजण तर 23 मेला पुन्हा चांदखेड येथे 4 रुग्ण आढळले. चांदखेड येथे एकाच कुटुंबातील पाचजणांना कोरोनाची बाधा झाली आहे.

अहिरवडे, वेहेरगाव तसेच नागाथली येथील रूग्णांच्या संपर्कातील लोकांची घेण्यात आलेल्या स्वॅब चाचण्यांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले  असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. चंद्रकांत लोहारे यांनी सांगितले.

मावळातच होणार स्वॅब टेस्ट व उपचारही!

मावळ तालुक्यात आढळलेल्या रुग्णांना व त्यांच्या अतिसंपर्कातील लोकांना स्वॅब टेस्टसाठी औंध येथील शासकीय रूग्णालयात नेले जात होते. परंतु तालुक्यातील रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तळेगाव दाभाडे येथील हाॅर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वॅब कलेक्शन सेंटर व कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले असून तळेगाव दाभाडे येथील मायमरचे डाॅ भाऊसाहेब सरदेसाई ग्रामीण रूग्णालयास कोरोना रूग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रूग्णांची स्वॅब टेस्ट व उपचार आता मावळातच होणार असल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.