Maval News : मावळ तालुक्यातील विविध विकासकामांसाठी केंद्र शासनाकडे 30 कोटींची मागणी – आमदार शेळके

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील गावांच्या विकासाकरिता तीस कोटी रुपये निधी मिळावा, अशा मागणीचे व प्रस्तावित कामांचे पत्र आमदार सुनील शेळके यांनी केंद्रीय ग्रामविकास मंत्री तथा कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना दिल्ली येथे भेट घेऊन दिले.

‘मावळचा ग्रामीण विकास साधण्यासाठी सुचविलेल्या कामांची लवकरच अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक निधी देण्यात येईल, असा सकारात्मक प्रतिसाद केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी यावेळी दिला.

मावळ तालुक्याच्या प्रत्येक गावात आवश्यक असलेल्या कामांची यादी आमदार शेळके यांनी तयार केली असून त्यासाठी राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

त्याचाच भाग म्हणून त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय ग्रामविकास मंत्र्यांना मावळातील ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

मावळातील विविध गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण करणे, रस्ते सुधारणा, व्यायामशाळा इमारती बांधणे, बंदिस्त गटार योजना, जलवाहिनी टाकणे, पाण्याच्या टाक्या बांधणे, समाज मंदिर, सभा मंडप बांधणे, ग्रामपंचायत इमारत उभारणी अशा स्वरुपाच्या कामांसाठी सुमारे 30 कोटी रुपयांचा निधी आमदार शेळके यांनी केंद्र शासनाकडे मागितला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.