Maval News : वडगावमधील ग्रीन फिल्ड सोसायटीतील 40 कुटुंब मागील पाच वर्षांपासून पाण्याच्या प्रतिक्षेत

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील वडगाव नगर पंचायत हद्दीतील ग्रीन फिल्ड सोसायटीतील सुमारे 40 कुटुंब गेल्या पाच वर्षापासून पाण्याच्या प्रतिक्षेत असून कोणी यांना पाणी देता का पाणी? अशी आर्त हाक देत नगरपंचायत प्रशासनाने हा पाण्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावून पाणीपुरवठा सुरु करावा, अशी मागणी मनसे तालुका अध्यक्ष रूपेश म्हाळसकर यांनी नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांना निवेदनाद्वारे केली आहे.

म्हाळसकर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मावळ तालुक्याची राजधानी व मुख्यालय म्हणून ओळख असणाऱ्या वडगावचे नागरीकरण मोठ्या झपाट्याने वाढू लागले आहे, तसतसे वडगाव ही हळूहळू आकार घेऊ लागले आहे. विकासाकडे वाटचाल करत असताना वडगाव हद्दीत अनेक मोठमोठे गृहप्रकल्प व उद्योग व्यवसाय निर्माण होत चालले असल्यामुळे वडगाव हे शहर म्हणून उदयास येऊ लागले आहे. मात्र वडगाव शहराची उंची, ओळख व सुंदरता प्राप्त करुन देणाऱ्या गृह प्रकल्पाना व तेथील राहिवाशांना काही तांत्रिक व इतर कारणास्तव नगरपंचायत मार्फत देण्यात येणाऱ्या सोईसुविधांपासून दूर राहावे लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.

ग्रीन फील्ड गृहप्रकल्पातील 40 कुटुंबिय, गेल्या पाच वर्षापासून पाण्याच्या व इतर सुविधापासून वंचित राहिली आहेत. तसेच या गृहप्रकल्पाकडे नगरपंचायत प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचे ही निवेदनात म्हाळसकर यांनी म्हटले आहे.

आपल्या रितीरिवाजानुसार आपण दारात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाणी देतो व त्याची तहान भागवतो यातच आपण आपले प्रथम कर्तव्य मानतो. मात्र मागील काही वर्षापासून पाण्याची वणवण सोसत असणारे ग्रीन फील्ड नागरिक व त्यांच्या समस्याबाबत आपल्या कर्तव्याचा विसर पडलेली नगरपंचायत नेहमीच कानाडोळा करत आली आहे. ग्रीनफील्ड सदनिकाधारकांच्या बाबतीत माणुसकी व नैतिकता न ठेवता नियम व अटीच्या बाबत काटेकोर असणारे नगरपंचायत प्रशासन मात्र काही ठिकाणी नियम व अटी धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या पाणी पुरविणे यातच आपले कर्तव्य समजते का? असाही आरोप म्हाळसकर यांनी केला आहे.

निश्चितच पुढील काही दिवसात या सोसायटीची रीतसर नोंद नगरपंचायत कार्यालयात होईल.पण तो पर्यन्त तरी कोणत्याही अटी व शर्तीचे निर्बंध न लावता सनदशीर मार्गाने अर्जव विनवणी करणाऱ्या तेथील रहिवाशांचा जास्त अंत न पाहता माणुसकीच्या नात्याने नगरपंचायतीने त्यांचा पाण्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी विनंती म्हाळसकर यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.