Maval News : वडगावच्या गॅस शवदाहिनी प्रकल्पासाठी 80 लाख 48 हजार मंजूर

एमपीसीन्यूज : वडगाव मावळ शहरातील स्मशानभूमी येथे गॅस शवदाहिनी प्रकल्प उभारणीसाठी सुमारे 80 लाख 48 हजार रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती वडगाव नगरपंचायतीचे नगराध्यक्ष मयुर ढोरे व मुख्याधिकारी सुवर्णा ओगले यांनी दिली.

या शवदाहिनी प्रकल्पाबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष ढोरे म्हणाले की, ” शहर व परिसरातील वाढते नागरीकरण लक्षात घेऊन व पर्यावरण पूरक प्रकल्प राबविण्याच्या हेतूने येथे गॅस शवदाहिनी प्रकल्पाची आवश्यकता होती.

जिल्हा नियोजन समितीच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत 2020-2021साठी नावीन्यपूर्ण योजनेतून वडगाव नगरपंचायतीच्या वतीने नगराध्यक्ष ढोरे यांनी गॅस शवदाहिनी प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव दोन महिन्यापूर्वी आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला होता.

या प्रस्तावाला जिल्हाधिका-यांनी प्रशासकीय मान्यता दिली असून या प्रकल्पासाठी प्रशासकीय कामाची रक्कम सुमारे 80 लाख 48 हजार रुपये इतकी मंजूर झाली आहे. येत्या दोन दिवसांत कामाची निविदा प्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी ओगले यांनी दिली आहे.

आमदार सुनिल शेळके यांनी गॅस शवदाहिनी प्रकल्प मंजूर करून दिल्याबद्दल वडगाव नगरपंचायत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांच्या वतीने आमदार शेळके यांचे आभार मानण्यात आले.

या कामासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी विशेष पाठपुरावा केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.