Maval News: तालुक्यातील 24 नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांसाठी जल जीवन मिशन अंतर्गत 24 पाणी पुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यासाठी 21 कोटी 87 लाख रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या योजनांच्या मान्यतेसाठी आमदार सुनील शेळके सातत्याने पाठपुरावा करत होते.

मावळ तालुक्यातील पाणी टंचाई असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करून 187 गावे व वाड्या -वस्त्यांच्या एकूण 125 पाणीपुरवठा योजनांचा समावेश जल जीवन मिशन अंतर्गत करून घेऊन त्यांपैकी पहिल्या टप्यात तीव्र पाणी टंचाई असणाऱ्या मावळातील 24 गावांसाठी नळ पाणी पुरवठा योजना लवकरात -लवकर राबविण्याची मागणी आमदार शेळके यांनी केली होती. त्यानुसार मावळातील सडवली, आढे, मळवंडी ठुले, कोथुर्णे, ताजे, येळघोल, शिवणे, करंजगाव, पाले ना.मा, सावळा, टाकवे खु., घोणशेत, कुसगाव प.मा, माऊ, फळणे, बेलज ,अजिवली, टाकवे बु., वडेश्वर, केवरे चावसर, कुरवंडे, तिकोना, भोयरे या गावांतील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी तब्बल 21 कोटी 87 लाख रुपयांचा निधीस गुरुवारी (दि .16) प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

प्रशासकीय मान्यता मिळालेल्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असून उर्वरित पाणी पुरवठा योजनांचा देखील सातत्याने पाठपुरावा सुरु असल्याचे शेळके यांनी सांगितले. पुढील तीन वर्षांत सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्यासाठीची वणवण थांबवून महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा खाली आणणे हे आमदार शेळके यांचे उद्दिष्ट असुन त्यासाठी वेळोवेळी त्यांनी विधानसभेत आवाज देखील उठविला आहे.

सातत्यपूर्ण पाठपुराव्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई असणाऱ्या गावांमधील 24 नळ पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानतो. या योजना लवकरात लवकर होण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्नशील असेल.
– आमदार शेळके 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.