Maval News: आमदार शेळके यांच्या हस्तक्षेपानंतर टोलनाक्यावर वाहनांच्या रांगा झाल्या कमी

एमपीसी न्यूज – आमदार सुनील शेळके यांनी (शनिवारी, दि.9) सोमाटणे टोल नाक्यावर झालेली वाहतूक कोंडी स्वत: गाडीतून खाली उतरून सोडवली होती. त्यानंतर त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना सूचना करून वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत तातडीने उपाययोजना करण्यास सांगितले होते. अखेर टोलनाक्यावर कर्मचारी व टोल केबिन व मशीनची संख्या वाढविण्यात आल्याने वाहनांच्या रांगा कमी झाल्या असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आमदार सुनील शेळके हे शनिवारी (दि. 9) एका कार्यक्रमासाठी देहूरोड या ठिकाणी गेले होते. तिथून परत तळेगावला जात असताना सायंकाळी ते सोमाटणे टोलनाक्यावर झालेल्या वाहतूक कोंडीत सापडले. बराच वेळ वाहतूक कोंडी सुटत नसल्याने आमदार शेळके स्वत: गाडीतून खाली उतरले. त्याठिकाणी एक तास थांबून त्यांनी टोल न भरताच वाहने सोडून दिली.

टोलनाक्यावर दररोज एक ते दोन किलोमीटर पर्यंत रांगा लागतात. त्यामुळे टोलनाक्यावर लेनची संख्या वाढवावी, कामगार संख्या वाढवावी, वाहनचालकांना त्वरित पावती मिळावी, अशा सूचना त्यांनी केल्या. याबाबत आठ दिवसांत नियोजन न केल्यास सर्व वाहने टोल न घेताच सोडण्यात येतील, असा इशारा शेळके यांनी दिला होता.

टोल काऊंटरवर कर्मचाऱ्यांची संख्या 8 वरून 12 करण्यात आली आहे. तसेच, पावती मशीनची संख्या 10 केली आहे. टोलचे व्यवस्थापक महादेव तुपारे यांनी याबाबत माहिती दिली.

टोलनाक्यावर दररोजच्या होणा-या कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले होते. पावती मिळण्यासाठी होणारा विलंब, कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नियोजनात असलेला आभाव याचा वाहनचालकांना फटका बसत होता. कर्मचारी आणि पावती मशीनची संख्या वाढवल्यामुळे टोलनाक्यावर आता वाहनांच्या रांगा कमी झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.