Maval News: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीतून तोडगा निघेल- खासदार श्रीरंग बारणे

हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती आहे. गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ते भेटण्यासाठी आले होते, असेही ते म्हणाले.

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यावर काहीतरी निर्णय घेणे आवश्यक आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. शेतकरी, सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीतून यावर निर्णायक तोडगा निघेल, असा विश्वास मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला. हा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सविस्तर माहिती आहे. गोळीबारात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना ते भेटण्यासाठी आले होते, असेही ते म्हणाले.

बंदिस्त जलवाहिनी आंदोलनात हौतात्म्य आलेल्या शेतकऱ्यांना खासदार श्रीरंग बारणे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी ते बोलत होते. हुतात्मा शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करताना मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके देखील उपस्थित होते.

माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे, पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका अध्यक्ष रवींद्र आप्पा भेगडे, माजी अध्यक्ष प्रशांत ढोरे, बाळासाहेब घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, जिल्हा परिषद सदस्या अलका धानिवले, नारायण बोडके, पांडुरंग ठाकर, गणेश ठाकर, शंकर देशमुख, मुकुंद ठाकर, सरपंच शिवाजी सुतार, विश्वनाथ जाधव, किसन खैरे, ज्ञानेश्वर ठाकर, किसन गावडे, पै शाम निंबळे, पै धोंडीबा आडकर, माजी सरपंच रमेश आडकर आदीसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “9 ऑगस्ट 2011 रोजी पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध करणारे आंदोलन झाले. तत्कालीन शासनकर्त्यांनी पोलीस बळाचा वापर करून बंदिस्त जलवाहिनी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर झालेल्या आंदोलनात पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. यात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, शामराव तुपे या तीन शेतकऱ्यांना हौतात्म्य आले. तर 12 शेतकरी गोळीबारात जखमी झाले.

या प्रकरणाला नऊ वर्षे झाली. पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीमधून पाणी मिळावे, अशी शहरवासीयांची मागणी आहे. तर बंद जलवाहिनीतून पाणी न नेता शहराला नदीपात्रातून पाणी पुरवावे, अशी मावळच्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या याबाबत तीव्र भावना आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यायाने सर्वसामान्य करदात्यांचे कोट्यवधी रुपये या प्रकल्पात गुंतले आहेत. सर्वसामान्य करदात्यांचे यामध्ये नुकसान होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील प्रत्यक्ष पवना बंद जलवाहिनी आंदोलनातील कार्यकर्त्यांची भेट घेऊन मावळात भेट दिली होती. त्यांना या प्रश्नांची संपूर्ण माहिती आहे. त्यामुळे तोडगा काढण्यात अडचण येईल असे मला वाटत नाही.

सर्वपक्षीयांची बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या भावनेशी न खेळता काहीतरी तोडगा काढायलाच हवा. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपण बैठकीची मागणी करणार असल्याचेही खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.