Maval News : गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना घरातूनच श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर 9 ऑगस्ट 2011 रोजी बौर येथे पोलिसांनी गोळीबार केला होता. त्यात तीन शेतकरी शहीद झाले होते.

एमपीसी न्यूज – पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधात नऊ वर्षांपूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात शहीद झालेल्या शेतकऱ्यांना आज (रविवारी) सर्वांनी घरातूनच श्रद्धांजली वाहावी, असे आवाहन पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी यांनी केले आहे.

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी मावळ तालुक्‍यातील बौर येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या घटनेला आज बरोबर 9 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे व मोरेश्वर साठे हे तीन शेतकरी शहीद झाले होते. या शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी पवनानगर येथे मावळ तालुक्‍यातून नागरिक येत असतात.

यावर्षी देखील आज (रविवारी) सकाळी 12 वाजून 40 मिनिटांनी येळसे येथील शहीद स्मारकाजवळ श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे, मात्र देशामधील कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जमाव बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

फक्त ठराविक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थित सुरक्षित अंतराच्या नियमांचे पालन करून शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. इतर सर्वांनी घरातूनच आज दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी शहीद शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, असे आवाहन ज्ञानेश्वर दळवी यांनी केले आहे.

दरम्यान, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करून शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावरील त्याबाबतच्या नोंदी शासनाने रद्द कराव्यात, या मागणीचा यानिमित्ताने पुनरुच्चार करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.